Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस ; आखेगावात पुराचे पाणी ; नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे युध्दपातळीवर प्रयत्न

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर-  शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. शेवगाव तालुक्यातील आखेगावाच्या नंदीनदीला प्रथमच पूर  आला असून, गावात पाणी शिरले आहे. १०० कुटुंबांचा संपर्क तुटला आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हालविण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने युध्दपातळीवर काम सुरु केले. जोरदार पावसामुळे नगरची सीनानदी भरून वाहत आहे, सीना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नगर- कल्याण रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.  


हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना कालपासूनच जोरदार पावसाने झोडपले आहे.अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. काल सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने दुसऱ्या दिवशीही आपली संततधार सुरूच ठेवली आहे. रात्रीपासूनच नगर शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सीनानदीला पुरस्थिती निर्माण झाली असून नगर- कल्याण महामार्ग, नालेगांव -लांडेथळ रस्ता,सावेडी - बोल्हेगांव रस्ता वाहतुकीसाठी काहीकाळ बंद होता.
सततच्या पावसामुळे नगर शहरातील रस्तेही जलमय झाले असून सखलभागात पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने सीना नदी काठावर बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीनानदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी पुलावरून वाहने घालू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे. कालपासून सुरू असलेल्या या पावसामुळे नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर शेतात पाणी शिरल्याने शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव ,पारनेर, राहुरी या तालुक्यासह इतरही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. शेवगाव तालुक्यातील पावसाचा जोर अधिक असल्याची माहिती आहे. शेवगाव शहरातील सखल भागात पाणी साचले असून अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या माहिती आहे. त्यात पावसाची संततधार अजूनही सुरू असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

Post a Comment

0 Comments