Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- जवखेडे खालसा (ता.पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांडातील तपासात जप्त केलेल्या काही मुद्देमालाची शहानिशा आणि निशाणी क्रमांक देण्याची त्रुटी राहिली होती. या घटनेच्या वेळेचे पंच म्हणून काम पाहणारे हरिभाऊ सानप यांची सिमित मुद्यावर फेरसाक्ष बुधवारी (ता.11) नोंदविण्यात आली. अभियोजन (सरकारी) पक्षाच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत.

जवखेडे खालसा गावातील संजय जाधव (वय 42), त्यांची पत्नी जयश्री (वय 38) आणि एकुलता एक मुलगा सुनील (वय 19) या तिघांची ऑक्‍टोंबर 2014 मध्ये हत्या झाली होती. या हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके हे तपासाला मार्गदर्शन करण्यासाठी पाथर्डीला सुमारे एक महिना थांबले होते.

विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. उमेशचंद्र यादव यांची राज्य शासनाने नियुक्‍ती केली आहे. या खटल्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत दिलीप जाधव याने घटनेचे प्रत्यक्ष पोलिसांना दाखविले होते. आरोपींनी कपडे एका ठिकाणी जाळले होते. त्या ठिकाणी शर्टच्या बाहीचा भाग, कपडे जाळण्यासाठी वापरलेल्या लाकडी काड्या आणि राख मिश्रित माती पोलिसांनी जप्त केली होती.
या खटल्याच्या सुनावणीमध्ये या मुद्देमालाची शहानिशा करणे आणि निशाणी क्रमांक देण्याचे राहून गेले होते. ही त्रुटी असल्याने पंच हरिभाऊ सानप यांची समित मुद्यावर फेरसाक्ष घेण्यात आली. पंच सानप यांनी न्यायालयात या वस्तू अचूकपणे ओळखल्या. आरोपींच्या वकिलांनी उलट तपासणी घेतली. उलट तपासणीही पूर्ण झाली आहे. याच बरोबर या खटल्यात सरकारी पक्षाच्या सर्व साक्षी पूर्ण झाल्या आहेत. या खटल्याची पुढील सुनावणी आता ता.23 ऑगस्ट रोजी होणार आहे. 

Post a Comment

0 Comments