Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीयवाद फोफावला : प्रवीण दरेकर

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद वाढल्याचा आरोप करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या मताशी सहमत असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच राज्यात जातीयवाद वाढला आहे, असा आरोप दरेकर यांनी देखील आता केला आहे.
प्रवीण दरेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी निगडीत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्या भूमिकेला, बोलण्याला काहीतरी अर्थ आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पाहिलं तर कुणी जातीपातीचं राजकारण केलं ते सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे मला असं वाटत नाही. अशाप्रकारे जातीयवाद फोफावण्याचं काम राष्ट्रवादीनेच केलं आहे, असा गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
मनसेसोबत युतीचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही
मनसेसोबत युती करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. तसा विचारही नाही. भाजपसोबत मनसे पदाधिकारी येत असतील तर ती महाराष्ट्राच्या हिताची बाब आहे. मनसे जबाबदार पक्ष आहे, त्यामुळे ही बाब स्वागतार्ह आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप २४ तास निवडणुकांना सामोरे जायला तयार असल्याचं देखील सांगितलं.
राज ठाकरेंचा आरोप शरद पवारांचं उत्तर

राज ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देताना शरद पवार यांनी उत्तर दिलं. राज ठाकरे यांना माझा सल्ला आहे की, त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंचं लिखाण वाचलं पाहिजे. त्यातून त्यांचे गैरसमज दूर होतील, असा टोला शरद पवार यांनी लगावला होता. त्यानंतर शरद पवारांच्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे यांनी पलटवार केला. मी प्रबोधनकार ठाकरे जसे वाचलेत तसे यशवंतराव चव्हाण देखील वाचलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जाती जातीमधे द्वेष निर्माण होत गेला. जातीपातीचे राजकारण आधीही होत होते. मात्र, राष्ट्रवादीकडून द्वेष निर्माण करण्यासाठी राजकारण करण्यात आले. महाराष्ट्रातील जनता कधीतरी विकासाच्या मुद्यावर मत देईल ही अपेक्षा. प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणातील हवे तेवढेच घ्यायचे असं केलं जातंय. यशवंतराव चव्हाणांची विचार करण्याची प्रक्रिया कशी होती हे देखील मला ठावूक आहे. मी शरद पवारांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलाखत घेतली होती तेव्हा मुलाखती आधी म्हटलं होतं की काही गोष्टी आज राखून ठेवाव्या लागतील. कारण वाढदिवसाच्या दिवशी चांगलं बोलायच असतं, असं राज ठाकरे म्हणाले.


Post a Comment

0 Comments