Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेखा जरे खून प्रकरण : बाळ बोठे यास जामीन देण्यास सरकार पक्षाचा विरोध

 
👉आरोपी बोठे याचे वकील ॲड. महेश तवले यांना म्हणणे सादर करण्यासाठी आता दि. 17 ऑगस्ट रोजी सुनावणी 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर-  रेखा जरे खूनप्रकरणातील आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे यास नियमित जामीन मिळावा, असा आरोपीच्या वकीलाने न्यायालयात  केलेल्या अर्जास सरकार पक्षांच्या वतीने विरोध करण्यात आला. बुधवारी (दि.11) विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी जामीन अर्जावर म्हणणे सादर केले.
अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी बाळ बोठे यांच्या नियमित जामीन अर्जावर बुधवारी  सुनावणी झाली.

ॲड. यादव यांनी युक्‍तीवादात म्हटले  की, रेखा जरे यांना मारण्यासाठी दोनवेळा प्रयत्न झाले आहेत. यापैकी, प्रथम दि.24 नोव्हेंबर 2020 रोजी प्रयत्न झाला. यावेळी एका डॉक्‍टरचे वाहन मयत रेखा जरे यांच्या वाहनामागे असल्याने टेम्पोच्या सहाय्याने अपघाती खून करण्याचे नियोजन फसले.
दि. 30 नोव्हेंबर 2020 रोजी मयत रेखा जरे यांना मारण्यासाठी आरोपी क्रमांक- 6  बाळ बोठे यांनी मयत रेखा व तिची आई सिंधूबाई वायकर यांना वैद्यकीय उपचारासाठी पुण्याला पाठविले. यानंतर त्यांच्या जाताना- येताना लोकेशन सातत्याने घेऊन आरोपी क्रमांक- 5 सागर भिंगारदिवे याला सांगितले. आरोपी भिंगारदिवे हा मयत रेखा जरे यांचे लोकेशनची माहिती आरोपी क्रमांक- 2 आदित्य चोळके याला सांगत  होता. आरोपी चोळके हा लोकेशनची माहिती आरोपी क्रमांक- 1 ज्ञानेश्‍वर उर्फ गुड्ड्या शिंदे व आरोपी क्रमांक-3 फिरोज शेख यांना देत होता.
यानंतर पारनेर तालुक्यातील नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाट येथे रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास आरोपी ज्ञानेश्‍वर शिंदे आणि फिरोज यांनी वाहनाने कट मारल्या, याच कारणातून भांडण काढले,  त्यावेळेस आरोपी फिरोज याने मयत रेखा जरे यांचा फोटो काढून आरोपी आदित्य चोळके व सागर भिंगारदिवे यांच्यामार्फत बाळ बोठे यांना पाठवित होता.
मारण्याची व्यक्‍ती मयत रेखा जरे असल्याबद्दल आरोपी बोठे याला सांगितल्याने आरोपी ज्ञानेश्‍वर शिंदे व फिरोज शेख यांनी बोठे याच्या इशाऱ्यावरून धारदार चाकूने गळा कापून निर्घृण खून केला. मयत जरे यांच्या समवेत उपस्थित असणाऱ्या विजयमाला माने, आई सिंधूबाई, मुलगा कुणाल हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, असे आरोपपत्रात नमूद केले आहे.
मयत रेखा जरेचा खून झाल्यावर बोठे याने सुपारीचे 12 लाखांची रक्कम पिवळ्या बॅगेतून आरोपी भिंगारदिवे  याला दिली. आरोपींमध्ये मोबाईलवर बोलणे झाल्याचे बोठे यांच्या कार्यालय तसेच सागर याच्या घराबाहेरील सीसीटीव्हीत दिसून येत आहे. सुपारीच्या रक्कमेपैकी सहा लाख 50 हजार रुपये भिंगारदिवे याच्या घरातून पंचासमक्ष हस्तगत करण्यात आले आहेत.
आरोपींमध्ये ता. 24 व ता. 30 रोजी मोबाईलद्वारे अनेकदा संभाषण झाल्याचे स्पष्ट होत आहे.
खुनाच्या घटनेच्या वेळेस रेखाचा मुलगा कुणाल याने आरोपीचा फोटो काढला आहे. तो महत्वाचा दुवा ठरत आहे.
बोठे यांनी रेखा जरेशी वितुष्ठ आल्याने शांत डोक्‍याने कट रचून खुनासाठी भिंगारदिवे व चोळके मार्फत पैसे पुरविले आहेत. खुनाच्या घटनेनंतर अटकेच्या भीतीने शंभरपेक्षा जास्त दिवस तेलंगणा राज्यात आश्रय घेतला होता. बोठे यांना कायदेशीर ज्ञान आहे. घटने अगोदर आणि त्यानंतरचे वर्तन लक्षात घेऊन जामीन देऊ नये, असे म्हणणे सादर करण्यात आले.
👉आरोपीच्या वकिलांची मुदतवाढ मिळावी, मागणी
आरोपी बाळ बोठे याचे वकील ॲड. महेश तवले यांनी न्यायालयात  म्हणणे सादर करण्यासाठी मुदत वाढवून मागितली होती. त्यावर सरकारी वकील यादव यांनी आपले म्हणणे न्यायालयाने ऐकून घ्यावे. त्यावेळेस आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित राहावे, असे म्हणणे सादर केले. न्यायालयाने हे म्हणणे मान्य करून यादव यांना म्हणणे सादर करण्यास सांगितले. आरोपी बोठे यांचे वकील ॲड. महेश तवले यांना म्हणणे सादर करण्यासाठी आता दि. 17 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments