Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लग्न फसवणूक प्रकरणातील फिर्यादिस 80 हजार रु परत ; कर्जत पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 
 कर्जत : -  लग्न करून फसव्या टोळीतील 'नववधू' पळाली होती, तिला आणि इतर आरोपी यांना अटक करून 80 हजार रु जप्त करण्यात आले. जप्त रक्कम ही फिर्यादीस परत देऊन कर्जत पोलिसांनी मोठे कौतुकास्पद काम केले आहे. या कामगिरीबद्दल  जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी विशेषतः पो.नि.चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलिस कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे.


 'लग्नासाठी मध्यस्ती करून आम्ही तुम्हाला थेट नवरीच उपलब्ध करून देतो...प्रसंगी मध्यस्ती हेच नवरीचे नातेवाईक होऊन लग्नासाठी लाखो रुपये आपल्या ताब्यात घेऊन लग्नसोहळा पारही पडतो..2 दिवसातच नवरी मात्र लघुशंका किंवा इतर कारण देऊन क्षणात पलायन करते.अशाच फसव्या टोळीचा प्रसंग कुणाबाबत घडला असेल तर नवल वाटायला नको! आता असाच प्रकार तालुक्यातील आखोणी गावातील  युवकाबरोबर घडला आहे.मात्र कर्जतच्या पोलिसांनी या टोळीचा छडा लावत यातील आरोपींना जेरबंद करून फसवणुकीतील काही रक्कम हस्तगत करून ती फिर्यादीला मिळवून देण्याची कामगिरी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी नामे(शुभम शिवाजी शर्मा) वय २९ (नाव बदलले आहे) रा.आखोणी ता.कर्जत या युवकाला लग्न लावून देतो म्हणून आरोपी राजु उर्फ राजेंद्र वैजनाथ हिवाळे (रा.माजलगाव ता.जि.परभणी), विलास जीजरे (रा.हिंगोली जि.हिंगोली),मंगलाबाई दत्तराव वाघ (रा.पोखणी ता.जि.परभणी) यांनी आरोपी नवरी नामे पल्लवी गोमाजी सगट (वय २० वर्षे) रा.मोहाला ता. सोनपेठ जि.परभणी हिचे पूर्वी तीन विवाह होऊनही तिच्या विवाहाची माहिती लपवुन आपल्या आर्थिक फायद्यासाठी २ लाख रुपये घेऊन तसेच इतर खर्चापोटी १० हजार असे २ लाख १० हजार रुपये घेतले. यातील मंगलाबाई वाघ हिने नवरीसोबत नाते असल्याचे खोटे भासवून नवरी पल्लवी हिच्याशी लग्न लावून दिले.आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे समजताच फिर्यादीचे कर्जत पोलिसात धाव घेतली. कर्जत पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून फसवणूक झालेल्या रकमेपैकी ८० हजारांची रक्कम फिर्यादीकडे सुपूर्द केली आहे.

👉नागरिकांनो अशा फसव्या टोळींपासुन सावध रहा!
   तरुणांचे विवाह रखडल्याचे हेरून लग्न लावून देणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.खोटी नाती भासवून व खरी माहिती लपवुन आर्थिक फसवणूक करून नवरीसह पलायन केले जाते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. तसा संशय आला तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.
      - पो.नि.चंद्रशेखर यादव, कर्जत 

Post a Comment

0 Comments