Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेमडेसिविर इंजेक्शन विक्री रॅकेटवर छापा ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करण्याच्या घटना राज्यभरात सर्वत्र होत असतानाच नगरमध्ये एलसीबी पथकाने याचा पडदाफाश केला आहे. औरंगाबाद महामार्गावरील वडाळाबहिरोबा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रेमडेसिविर इंजेक्शन विक्री रॅकेटवर छापा टाकून चौघांना अटक केली. या गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल व इंजेक्शन असा 11 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
रामहरी बाळासाहेब घोडेचोर (वय 22, रा. देवसडे, ता. नेवासा), आनंद पुंजाराम थोटे (वय 28, रा. भातकुडगाव ता. शेवगाव), पंकज गोरक्षनाथ खरड (वय 29, रा. देवटाकळी ता. शेवगाव) व सागर तुकाराम हंडे (वय 30, रा. खरवंडी ता. नेवासा) या चौघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी पसार झाला आहे. कोरोना उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शन वडाळाबहिरोबा येथे विनापरवाना विकले जात असल्याची माहिती गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, कर्मचारी सुरेश माळी, संतोष लोंढे, लक्ष्मण खोकले, दीपक शिंदे, रविंद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, प्रकाश वाघ, योगेश सातपुते, उमाकांत गावडे व पथकाने पंचांसह तेथे छापा टाकून चार जणांना अटक केली.
या अगोदरही नगरमध्ये भिंगारमध्ये असा प्रकार घडला होता. त्यावेळी कॅम्प पोलिसांनी कारवाई करून 15 इंजेक्शन हस्तगत केले होते. इंजेक्शन जप्त झाल्या नंतर ते न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा रूग्णालयांमध्ये देण्यात आले होते. नगर शहरामध्ये हा प्रकार त्यावेळेला उजेडात आल्यानंतर आता जिल्हाभर यामध्ये पोलिसांनी धडक कारवाई मोहीम हाती घेतली. सोमवारी दि. 10 मे रोजी दुसरी कारवाई झाली आहे.
पंचांनी संबंधित व्यक्तीस मोबाईलवर संपर्क करुन रेमडेसिविर इंजेक्शनबाबत विचारणा केली. एका इंजेक्शनची किंमत 35 हजार रुपये सांगून वडाळा येथील हॉटेल समाधानसमोर येण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पथकाने सापळा रचून चार जणास अटक केली. एक आरोपी पसार झाला. या कारवाईत एक कार, एक मोटारसायकल, मोबाईल, रेमडेसिविर इंजेक्शन असा 11 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल अधिक तपास करत आहेत. अन्न व औषध प्रशासनचे निरीक्षक अशोक तुकाराम राठोड यांच्या फिर्यादीवरुन कोविड 19 साथ आजारचा फायदा घेण्याच्या उद्देशाने औषध किंमत नियंत्रण आदेश 2013, कलम 3(2) भादवी 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments