Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बोगस डॉक्टरवर छापा ; कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला

 


👉 बोगस डॉक्टरने आरडा-ओरड करून जमाव गोळा करून केली पथकाला धक्काबुक्की; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पैठण - बोगस डॉक्टरवर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर डाॅक्टराने बोलवलेल्या जमावाकडून हल्ला झाल्याची घटना पैठण येथील बालानगर येथे घडली. छापा पडल्यानंतर त्या बोगस डॉक्टरने आरडाओरडा करून गाव गोळा करीत पथकाला धक्काबुक्की केली, याप्रकरणी 5 आरोपीविंरुद्ध पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैठण येथील बालानगर या ठिकाणी डॉ. अरबिंदो बिस्वास हा बोगस दवाखाना चालवत असल्याची माहिती आरोग्य पथकाला मिळाली. यावरूनच पैठण तालुका आरोग्य अधिकारी भूषण आगाज, वैद्यकीय अधिकारी युसुफ मनियार, वैद्यकीय अधिकारी सुभाष थोरात यांच्या पथकाने बोगस डॉक्टर बिस्वास याच्या रुग्णालयावर छापा टाकला. या दरम्यान बिस्वास याच्याकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शिक्षणाची डिगरी मिळाली नाही. अ‌ॅलोपॅथी औषधे, इंजेक्शनेचा साठा व शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे या ठिकाणी मिळून आली.
रुग्णालयाची तपासणी सुरू करित असताना बोगस डॉ. बिस्वास याने आरडाओरड करून जमाव गोळा केला. या जमावाने तपासणी पथकास धक्काबुक्की करुन कारवाई करताना अडथळा निर्माण केला. यावेळी आरोपी भगवान गोर्डे, शिवाजी गोर्डे यांनी डॉक्टरवर कारवाई करू नका, असे म्हणत पथकाला शिवीगाळ, धक्काबुक्की केली. एवढेच नाही तर इंजेक्शनचा साठा व शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे घेऊन ते पळून गेले. त्यांनी या बोगस डॉक्टरला फरार होण्यास मदत केली.
दरम्यान कोरोना काळात आरोपी रवी भुजबळ, आसिफ शेख यांच्यासह गावातील लोकांनी गर्दी केली होती. आरोपी डॉ. अरविंद बिस्वास याने गावातील लोकांचा डॉक्टर आहे असे भासवून फसवणूक केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. युसूफ मनियार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बालानगर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच आरोपीविंरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स. पो. नि. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.

Post a Comment

0 Comments