Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी नियोजन समितीचा ३० टक्के निधी वापरणार : पालकमंत्री हसन मुश्रिफ

 

👉सर्वांनी मिळून संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची गरज, 👉पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने आपल्याला आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यास भाग पाडले. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. त्यादृष्टीनेच अधिकच्या आरोग्य सुविधा निर्माण करुन कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आपण सज्ज होत आहोत, असे प्रतिपादन जिल्ह्यात आरोग्य राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात सर्वसामान्यांसाठी केलेले काम अभिमानास्पद असल्याचे सांगत देश आणि राज्यासाठी हे काम आदर्शवत असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. या आरोग्य मंदिरासाठी दोन लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आमदार निलेश लंके यांनी सुरु केलेल्या अकराशे बेडसच्या कोविड केअर सेंटर अर्थात खासदार शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच पारनेर तालुक्याचा आढावाही घेतला. त्यानंतर त्यांनी श्रीगोंदा येथे श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. भाळवणी येथील कार्यक्रमास आमदार निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांच्यासह सरपंच राहुल झावरे, बाबाजी तरटे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती तर श्रीगोंदा येथील कार्यक्रमास आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
भाळवणी येथील कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आमदार लंके यांच्या कामाविषयी भरभरुन कौतुक केले. कोरोना संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जात त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून कार्यरत राहणाऱ्या आमदार लंके यांनी लोकसेवेचा आदर्श घालून दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी कोविड केअर सेंटरची पाहणी करुन संवाद साधला तसेच पारनेर तालुका आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी श्रीगोंदा येथे तालुका आढावा बैठक घेऊन प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
पालकमंत्री म्हणाले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. आपल्याला यापुढील काळातही अधिक सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर आपण काहीसे निर्धास्त झालो. ठिकठिकाणी लग्नसोहळे, विविध समारंभ झाले. त्यामुळे दुसऱ्या लाटेत त्याचा गंभीर फटका आपल्याला बसला. अतिशय वेगाने ही लाट आली. ऑक्सीजन पुरवठा, लसीकरण, औषध उपलब्धता आदीबाबत नव्याने नियोजन करण्यास या लाटेने भाग पाडल्याचे ते म्हणाले.
संभाव्या तिसरी लाट लक्षात घेऊन आणि पहिल्या व दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन आता प्रशासन म्हणून आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण सर्वांनी तयार राहिले पाहिजे. जी अत्यावश्यक पूर्वकाळजी आहे, ती घेतली गेली पाहिजे. जिल्ह्यात त्यादृष्टीने ऑक्सीजन उपलब्धता, ऑक्सीजन बेड्सची व्यवस्था, औषधसाठा उपलब्धता याचे नियोजन आणि तयारी आतापासूनच केली जात आहे. विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत. आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी खर्च कऱण्यास मान्यता देण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्रापैकी एक असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानची मोठी मदत या आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांवर असलेला ताण मोठ्या प्रमाणात हलका होणार असल्याचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी नमूद केले. जिल्ह्यात १४ ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प लवकरच सुरु होणार आहेत. याशिवाय, राज्य शासनाकडून आपण जिल्ह्यासाठीचा ऑक्सीजन पुरवठा वाढवून आणल्याचेही ते म्हणाले.
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांचे केंद्र सरकार, न्यायालये आणि केंद्रीय आरोग्य यंत्रणेनेही कौतुक केल्याचे सांगून पालकमंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, यापुढील काळात जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. केंद्र शासनाकडून पुरेसा लसपुरवठा व्हावा, यासाटी राज्य शासन पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यात किमान ८० टक्के लसीकरण पूर्ण व्हावे, असे सरकारचे प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या कोरोनाबरोबरच आता राज्यात म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळून येत आहेत. आपल्या जिल्ह्यातही १७३ रुग्ण आढळले आहेत. त्यासाठी आवश्यक इंजेक्शन्स सध्या जिल्ह्यात उपलब्ध असले तरी अधिकची गरज लागणार आहे. त्यादृष्टीने ती मिळविण्यासाटी प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
पारनेर आणि श्रीगोंदा तालुका आढावा बैठकीत त्यांनी दोन्ही तालुक्यांतील विविध अडचणी समजावून घेतल्या. जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करण्यात आल्यामुळे रुग्णांमार्फत होणारा संसर्ग थांबेल आणि ही साखळी तोडण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनीही स्वताहून आता अधिक जबाबदारीने काळजी घेण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनीही आपापल्या भागात नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी काळजी घेण्याबाबत सांगितले पाहिजे. तिसऱ्या संभाव्य लाटेत मुलांना अधिक धोका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली.
पारनेर तालुका आढावा बैठकीत आमदार लंके यांनी तालुक्यातील परिस्थितीची कल्पना दिली. तर श्रीगोंदा येथील बैठकीत आमदार पाचपुते, श्री. शेलार यांच्यासह विविध पदाधिकारी यांनी तालुक्यातील कोरोना रोखण्यासाठी अधिक गंभीरपणे उपाययोजना करण्याची गरज प्रतिपादित केली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांच्या साह्याने करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. याकामी विविध तालुका-गावात तेथील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, खासगी डॉक्टर्स यांचीही मदत होत असल्याचे ते म्हणाले. 

Post a Comment

0 Comments