Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

व्यापारी, फेरीवाले, पथारीवाले, सलून व्यावसायिक यांना आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी दुकाने सायं.पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्या ; काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी, प्रशासनाला सुचविले विविध पर्याय


  
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : मागील लॉकडाऊनमध्ये व्यापारी, फेरीवाले, पथारीवाले, हातावर पोट असणारे, सलून व्यावसायिक यांचे कंबरडे मोडले. त्यातून सावरत असतानाच दुसऱ्या लॉकडाऊनला सामोरे जाण्याची दुर्दैवाने आपल्यावर वेळ आली आहे. असे असले तरी कोरोना संदर्भातील आवश्यक ती खबरदारी घेत या सर्व घटकांना आर्थिक संघटनातून वाचविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापाऱ्यांना, दुकानदारांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी केली आहे.
किरण काळे म्हणाले की, आम्ही व्यापारी बांधवां समवेत आहोत. व्यापारी असोसिएशनशी देखील आम्ही चर्चा केली आहे. काँग्रेस पक्षाचा व्यापारी वर्गाला संपूर्ण पाठिंबा आहे.   याबाबत अधिक माहिती देताना ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा म्हणाले की, वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय आहे.प्रशासन स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.अनेक व्यवसायिक,व्यापारी, फेरीवाले, पथारीवाले,  सलून व्यवसायिक आदींनी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधला आहे. मागील लॉकडाऊन नंतर अनेकांचे बँकांचे कर्जांचे हप्ते यामुळे थकलेले आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांनी घाऊक व्यापाऱ्यांकडून माल उचललेला आहे. तर घाऊक व्यापाऱ्यांनी मोठ्या कंपन्यांकडून माल उचललेला आहे. या खरेदीची देणी या व्यापाऱ्यांची बाकी आहेत. बाजारात माल विकलाच गेला नाही तर ही देणी कशी फेडायची असा प्रश्न व्यापारी बांधवांसमोर आ वासून उभा आहे. 
कोरोनाची सध्याची गंभीर स्थिती लक्षात घेता तसेच व्यापाऱ्यांना आणि इतर वर्गांना देखील आर्थिक संकटातून काही अंशी आधार देण्याच्या दृष्टीने आम्ही किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला काही पर्याय सुचविले असल्याचे मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने सुचवलेले पर्याय पुढीलप्रमाणे आहेत. व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अथवा बाजारपेठेतील तसेच ज्या-ज्या ठिकाणी व्यापारी संकुल, दुकाने आहेत अशा ठिकाणी सम-विषम प्रणालीचा उपयोग करत दुकानांच्या रांगेतील एक आड एक दुकाने सम व विषम तारखांना किमान सहा ते सात तासांसाठी उघडण्याची परवानगी देण्यात यावी. अशाच पद्धतीने फेरीवाले, हातगाडीवाले, पथारीवाले यांचे देखील नियोजन करण्यात यावे.
व्यापाऱ्यांना तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे वयोगटाचा निकष शिथिल करत सरसकट लसीकरण करण्यात यावे. तसेच व्यापारी, हातावर पोट असणारे, किरकोळ विक्रेते, फेरीवाले, पथारिवाले, कामगार तसेच बचत गटाच्या महिला यांनी बँका, पतसंस्था, छोट्या फायनान्स कंपन्या यांच्या कडून कर्ज घेतलेली आहेत. आजमितीस मागील हप्ते देखील सुरळीत झालेले नाहीत. आताचा लॉकडाऊन सुमारे २५ दिवसांचा आहे. त्यामुळे या सर्वांना दरमहा अपेक्षित असणारे उत्पन्न येऊ शकणार नाही. सबब कर्ज पुरवठादारांची कर्ज या सर्व वर्गांना फेडणे कदापि शक्य नाही. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी बँका, पतसंस्था तसेच फायनान्स कंपन्या यांना लेखी पत्राद्वारे आदेश काढीत पुढील किमान तीन महिन्यांसाठी कर्ज वसुली न करण्याबाबतच्या सक्त सूचना द्याव्यात. 
सलून व्यावसायिकांच्या प्रश्नांसंदर्भात माहिती देताना अनिस चुडीवाला म्हणाले की, सलून व्यावसायिकांचे पोट हातावर आहे. सलून व्यवसायिकांना देखील यातून दिलासा देण्याबाबत विचार होणे गरजेचे आहे. सलून व्यावसायिकांना दर ठराविक कालावधीनंतर कोरोना चाचणी करून दुकानातील कारागीर निगेटिव्ह असल्याचा अहवाल दुकानात दर्शनी भागात चिकटवण्याचा सूचना करता येऊ शकते. दुकानात असणाऱ्या क्षमतेपेक्षा ५० टक्के क्षमतेने का होईना परंतु त्यांना आपली दुकाने सुरू ठेवण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार प्रशासनाने करावा अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे. 

Post a Comment

0 Comments