Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दहावीची परीक्षा रद्द, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय - शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई - राज्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढत असलेल्या पार्श्वभूमीवर इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर करून माहिती दिली आहे.
राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून परीक्षांबाबत संभ्रम विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात होता. आज अखेर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत दहावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली आणि यावर्षी परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावे यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमताने निर्णय झाला. या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले की, दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचे इंटरनल असेसमेंट होणार आहे. लवकरच याबाबत सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल. दरम्यान, बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील याविषयावर मत मांडले. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गामुळं प्रत्यक्ष पद्धतीने शाळा भरल्या नाहीत. वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरु होते. पण, देशातील इतर सात राज्यांमध्ये ती पुढे ढकलण्यात आली आहे त्याप्रमाणे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली. संपूर्ण मंत्रिमंडळानं तो निर्णय मान्य केला, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.Post a Comment

0 Comments