Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे पद कुणाकडे जाणार? अशी चर्चा रंगलेली असतानाच, दिलीप वळसे-पाटील हेच राज्याचे नवे गृहमंत्री असतील यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करण्याची तसंच गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्याची विनंती केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सध्या उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्रालयाची जबाबदारी आहे. यापैकी कामगार विभागाचा कार्यभार हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची इच्छा होती. मात्र, दिलीप वळसे-पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला होता. तर अजित पवार यांनी देखील पद सांभाळण्यास मोकळीक मिळत नसल्याने नापसंती दर्शवली होती. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडे हे पद देण्यात आलं होतं. मात्र, पुन्हा एकदा अत्यंत अवघड परिस्थितीत गृहमंत्री पद वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे.


Post a Comment

0 Comments