Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सॅनिटायझर पिल्याने 6 जणांचा मृत्यू

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
वाणी - कोरोनामुळे लावलेल्या लाॅकडाऊन काळात बंदीच्या कारणाने दारू न मिळाल्याने काही युवकांनी तल्लफ झाल्याने सॅनिटायझर पिण्यात आले. यानंतर वणी शहरात शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांत 6 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
दत्ता कवडू लांजेवार (वय ४७ रा. तेलीफैल), नूतन देवराव पाटणकर (वय ३५ रा. ग्रामीण रुग्णालय जवळ), संतोष मेहर (वय ३५ रा. एकता नगर), भारत प्रकाश रुईकर (वय ३८ रा. जटाशंकर नगर) असे मयत युवकांची नावे आहेत. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, मयत युवकांच्या जीवावर सॅनिटायझरची पार्टी बेतली गेली आहे. या घटनेचे गांभीर्य पाहून नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ हे वणीत घटनास्थळी दाखल हाऊन पाहणी केली. दोन दिवसांत दगावलेल्या सहा तरुणांपैकी केवळ दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले असून पोलिस दप्तरी त्यांची नोंद केली आहे. परंतु अन्य मृतांच्या नातेवाइकांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
शहरातील विविध भागात वास्तव्यास असलेले व्यसनी तरुण शुक्रवारी एकत्रित आले.त्यांनी सॅनिटायझर पार्टीचा बेत आखला. तीस मिली सॅनिटायझरची नशा एका निप एवढी होत असल्याचा ग्रह करीत त्यांनी मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर विकत घेतले. या पार्टीत किमान सहा ते सात युवक होते,अशी चर्चा असून त्या तरुणांनी मनसोक्त सॅनिटायझर प्राशन केले. काही वेळातच त्यांना मळमळ व उलट्या व्हायला लागल्या. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे दि. २३ एप्रिलला शहरातील जैताई नगर येथे वास्तव्यास असलेले गणेश उत्तम शेलार वय ४३ वर्ष तर सुनील महादेव ढेंगळे वय ३६ वर्ष असे दोघे सॅनिटायझर प्राशन केल्याने दगावल्याची माहिती मिळाली आहे. तर शनिवारी तब्बल चार तरुणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरातील अल्कोहोलिक व्यसनी व्यक्ती जीवाची पर्वा न करता सॅनिटायझर प्राशन करीत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सोबतच सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दारू दुकानेही बंद ठेवण्यात आली आहे. अशात लपून छपून अव्वाच्या सव्वा दराने विकल्या जात असलेली दारू विकत घेणे मद्यपींकरिता कठीण झाले आहे. ‘ना दुवा ना दारू’ अशीच काही अवस्था कोरोनाच्या काळात मद्यपींची झाली असताना तल्लफ भागवण्यासाठी विविध फंडे अवलंबण्यात येत आहे. अशात व्यसनी तरुण नशेकरिता सॅनिटायझरचा वापर करत असल्याचे वास्तव या घटनेमुळे समोर आले आहे.
घटना दुर्दैवी, समाज जागृती व्हावी: एसपी डाॅ. दिलीप भुजबळ
संपूर्ण प्रशासन कोविड १९ च्या नियंत्रणासाठी कामाला लागले आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. वेळोवेळी शासनाने दिलेले निर्देश नागरिकांनी पाळावे. सॅनिटायझर प्राशन करून वणीत सहा तरुणांचा मृत्यू झाला. ही बाब अतिशय दुर्दैवी असून सॅनिटायझरचा उपयोग हा कोरोनापासून बचाव करण्यासाठी आहे. मात्र अज्ञानामुळे व्यवसनाधीन याचे प्राशन करत आहे. याबाबत समाज माध्यमाद्वारे जागृती करणे गरजेचे झाले आहे.


Post a Comment

0 Comments