Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ज्युनि. रोबोटिक्स इंजिनिअर विराज म्माना नवीन पिढीसाठी आदर्श - ग्लोबलनगरी फौंडेशन, अमेरिका

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - लहानग्या वयातील विराजच्या दैदीप्यमान प्रवासापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, नवनव्या क्षेत्रातील नव्या वाटांची माहिती विद्यार्थी, पालक व शिक्षकांना व्हावी, म्हणून अमेरिका येथील ग्लोबलनगरी फाउंडेशनने विराजशी विशेष संवाद आयोजित केला होता. ग्लोबल नगरी परिवाराने नेहमीच अशा वेगळ्या वाटा चोखळणार्‍या कर्तृत्वाचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे, असे प्रतिपादन ग्लोबलनगरी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा तथा यंग व्हॅलेंटीयर्सच्या कार्यक्रमाच्या प्रमुख लता शिंदे यांनी केले.

मूळच्या नगर जिल्ह्यातील पण सध्या नोकरी, काम-धंद्यानिमित्त जगभरात स्थायिक झालेल्या भूमीपुत्रांच्या ‘ग्लोबल नगरी फाउंडेशन, अमेरिका’ या संस्थेच्या वतीने मातृभूमीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले जातात. जिल्हा परिषद, अहमदनगर शिक्षण विभागाच्या सहकार्याने गेल्या तीन वर्षांपासून ग्लोबलनगरी परिवाराचा जिल्हा परिषद शाळांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स, मेंटॉरशिप, इंग्लिश इम्प्रेव्हमेंट असे प्रोग्रॅम चालू आहेत. त्याचबरोबर होतकरू पण गरीब घरातील विद्यार्थ्यांची इंग्लिश इंप्रुव्हमेंटसाठी यंग व्हॉलेंटीयर्समार्फत प्रोग्रॅमदेखील चालवला जातो, ज्या अंतर्गत परदेशी स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या मुलांशी संवाद साधण्याची, त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घेण्याची संधी इथल्या मुलांना उपलब्ध करून दिली जाते.
त्याच अंतर्गत नगर जिल्ह्यातील तंत्रज्ञानात विशेष भरारी घेणार्‍या विराज अजय म्याना या इयत्ता नववीतील विद्यार्थ्याला ग्लोबल नगरी फाउंडेशनने जगभरातील विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. सातवीत असताना दूरचित्रवाणीवर आय आय टी मुंबईची रोबोटिक्सची जाहिरात पाहिली आणि तेव्हापासून मला या क्षेत्राची आवड निर्माण झाली. रोबोटिक्स, कोडिंग, वेब डिझाईन, अ‍ॅप डेव्हलपमेंट करत करत मी स्कूल मॅनेजमेंट सिस्टिम आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टिमसुद्धा विकसित केली. भविष्यात माझी आय आय टीतून पदवी प्राप्त करून गुगलबरोबर काम करण्याची व त्यातून भारतात तंत्रज्ञानाच्या क्रांतीतून देश विकास करण्याचे स्वप्न आहे, असे विराज म्याना म्हणाला. येथील केंद्रीय विद्यालयात 9वीत शिकणार्‍या ज्युनिअर रोबोटिक्स इंजिनिअर, आर्टिफिशियल इंटिलिजेंस इंजिनिअर असलेल्या विराज याच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील धवल यशाचा प्रेरणादामी प्रवास, गरुडझेप उलगडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या व्हर्चुअल प्रकट मुलाखतीत तो बोलत होता.
अवघ्या पंधरा वर्षाच्या विराजने तंत्रज्ञानात मोठी भरारी मारली आहे. कोडिंग, वेब डिझाईनिंग, पायथॉन, रोबोटिक्सचे जवळजवळ वीस कोर्स त्याने पूर्ण केले असून, मायक्रोसॉफ्ट, गूगल आदी विविध संस्थांची तीनशेपेक्षा जास्त प्रमाणपत्रे त्याने प्राप्त केली आहेत. भारत सरकारच्या सायन्स डिपार्टमेंटच्या प्रतिष्ठित इंस्पायर अवॉर्ड मानक स्पर्धेसाठी त्याच्या ’स्मार्ट स्कूल सिस्टीम’ची राज्यस्तरावर निवड झाली आहे. नुकताच आय आय टी, मुंबई आयोजित रोबोटिक्स स्पर्धेतसुद्धा त्याच्या मॉडेलला प्रथम क्रमांकाचा बहुमान प्राप्त झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत त्याने लेबर मॅनेजमेंट सिस्टीमसुद्धा विकसित केली आहे. जो प्रकल्प त्याने भारत सरकारला सादर केला आहे. ज्यातून श्रमिकांना आपल्या भागातच काम उपलब्ध होऊन त्यांचे स्थलांतर थांबेल.
फेस रेकग्निशनच्या माध्यमातून निवासी घरांची सुरक्षा मजबूत करण्यासाठीच्या एका प्रकल्पावर देखील विराज सध्या काम करीत आहे. आई-वडील, शिक्षक, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेल्ला हे विराजचे आदर्श असून, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी क्षेत्रात आणखी उंच भरारी घेऊन देश सेवा करायची आहे, असे तो म्हणाला.
आपल्याच जिल्ह्यातील या चिमुकल्याने जिद्द, चिकाटी आणि एक विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन आज हे यश प्राप्त केले आहे. त्याची समर्पित वृत्तीने शिकण्याची नवे काही तरी करण्याची वृत्ती आपल्या सर्वांसाठी आदर्श असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक, सूत्रसंचालक आणि ग्लोबल नगरी फाउंडेशनचे सेक्रेटरी रोहित काळे म्हणाले.
यापूर्वी ग्लोबलनगरी फाउंडेशनने देवराई प्रकल्पातून वृक्षलागवडीचा प्रचार करणारे प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे, आदर्शगांव पाटोदाचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील, ग्लोबल टीचर प्राईज विजेते भारतीय शिक्षक रणजित डिसले, शिवशाहीर विजयराव तनपुरे आदींसह अनेक यशस्वी लोकांच्या मुलाखतीचे आयोजन केले आहे.
या आभासी मुलाखतीसाठी ग्लोबलनगरी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर गोरे, सेक्रेटरी रोहित काळे, उपाध्यक्षा लता शिंदे, उपाध्यक्षा काजल शिंदे, ट्रेझरर अविनाश मेहेत्रे, महाराष्ट्र परिवहन मंत्रालय, सचिव अविनाश ढाकणे, तसेच ग्लोबलनगरी परिवारातील वेगवेगळ्या क्षेत्रांत कामगिरी करत असलेले मान्यवर व विराजचे आई-वडील, शिक्षक आदींसह जवळजवळ चाळीस देशांतील सदस्य विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments