Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

व्यापारी गौतम हिरण यांचा खून करणारे जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
श्रीरामपूर :  तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचा खून करणा-यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अटक करण्यास यश आले आहे. संदीप मुरलीधर हांडे (वय२६, रा . माळेगांव , ता. सिन्नर, जि. नाशिक), जुनेद उर्फ जावेद बाबु शेख (वय २५, रा. सप्तश्रृंगीनगर , नायगांव रोड , सिन्नर जि. नाशिक), अजय राजू चव्हाण (वय २६ रा. पास्तेगांव, मारुती मंदीरासमोर , सिन्नर , जि. नाशिक), नवनाथ धोंडू निकम ( वय २९, रा. उक्कडगांव, ता. कोपरगांव , जि अहमदनगर) व एक २२ वर्षीय आरोपी याना पकडण्यात आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की,
दि१ मार्च २०२१ रोजी बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण हे त्यांचे बेलापूर येथील दुकान बंद करुन मोटार सायकलवरुन सायंकाळी ७ वा. चे सुमारास बोराबके नगर, श्रीरामपूर येथील घरी जाण्यासाठी निघाले असता कोणीतरी अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले होते.याबाबत गौतम हिरण यांचे भाऊ पंकज झुंबरलाल हिरण , (वय ४५ , रा. बोरावके नगर, वार्ड नं. ७ , श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं .1 १३७/२०२१ भादवि कलम ३६३ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी गौतम हिरण यांचा खून करुन त्यांचे प्रेत श्रीरामपूर ते वाकडी जाणारे रोडवर यशवंत चौकी परिसरात आणून टाकल्याने दि.७ मार्च २०२१ रोजी अपहरणकर्त्या विरुध्द भादवि कलम ३०२, २०१ ही वाढीव कलमे लावण्यात आली होती. हा  गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून  विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्रचे प्रताप दिघावकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,   श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून गुन्ह्याचे तपासकामी वेगवेगळी पथके तयार करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांनी वेगवेगळी पथके तयार करुन स्वत : पथकाचे नेतृत्व करुन गुन्ह्याचा तपास सुरु केला. गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा करताना कोणताही पुरावा मागे राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली होती. तसेच श्रीरामपूर शहर हे मोठी व्यापारी बाजारपेठ असल्यामूळे व गुन्हा घडलेल्या कालावधीमध्ये व त्यानंतरचे कालावधीमध्ये श्रीरामपूर येथे मोठ्या प्रमाणात लोकांची ये–जा झालेली असल्यामूळे आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते .
अशा परिस्थितीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामधील अधिकारी व अंमलदार यांनी सहा दिवस अहोरात्र मेहनत घेवून तांत्रीक विश्लेषणाचे आधारे काही संशयित इसम निष्पन्न करुन त्यांचेवर लक्ष केंद्रीत करुन प्रथम संदीप मुरलीधर हांडे याला नाशिक येथून ताब्यात घेतले. पुढील तपासामध्ये आरोपी जुनेद उर्फ जावेद बाबु शेख, अजय राजू चव्हाण, नवनाथ धोंडू निकम व एक २२ वर्षीय आरोपी यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले .
सर्व आरोपी ताब्यात घेऊन श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपासी अधिकारी तथा श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी   संदीप मिटके यांनी तपासामध्ये आरोपीताकडून मयत गौतम हिरण यांचा रियल – मी कंपनीचा मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारुती व्हॅन ( एम एच १५ जी एल ४३८७) असा मुद्देमाल भारतीय पुरावा कायदा कलम २७ प्रमाणे जप्त केलेला आहे .
पुढील तपास श्री मिटके हे करीत आहेत . जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक दिपाली काळे व श्री मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके व त्यांचे पथकातील सपोनि मिथून घुगे, पोसई गणेश इंगळे , सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विजयकुमार वेठेकर, संदिप घोडके, विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, विशाल दळवी, रवि सोनटक्के, विजय ठोंबरे, सचिन आडबल, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, दिपक शिंदे, विशाल गवांदे, पोकॉ  योगेश सातपूते , संदीप दरंदले, रविन्द्र धुंगासे , शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, मयूर गायकवाड , मेघराज कोल्हे, राहूल सोळंके, रोहीत येमूल, आकाश काळे, चालक हेकॉ . उमाकांत गावडे, पोना भरत बुधवंत, अर्जून बडे, चा . पोहेकॉ  बबन बेरड , चंद्रकांत कुसळकर तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालय , श्रीरामपूर सायबर सेल येथील पोना फुरकान शेख , पोकॉ प्रमोद जाधव आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


Post a Comment

0 Comments