Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

देश उभारणीसाठी बलिदान दिलेल्या क्रांतीकारकांचे स्वप्न आजही अपूर्णच राहिले - सुभाष गुंदेचा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- देश बांधवांचे अश्रु पुसण्यासाठी धावून जाण्याची वृत्ती असलेल्या कुटूंबात भगतसिंग जन्माला आले. शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला ते महत्व देत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न त्यांच्यावर होणारे अन्याय यासाठी ते लढले. देश उभारणीसाठी बलिदान दिलेल्या या क्रांतीकारकांचे स्वप्न मात्र आजही अपूर्णच राहिले, अशी खंत शहर बँकेचे चेअरमन सुभाष गुंदेचा यांनी व्यक्त केली.
हुतात्मा स्मरण प्रबोधन मंच आयोजित हुतात्मा शहिद दिवस शहर सहकारी बँकेत साजरा करण्यात आला. क्रांतीकारक राजगुरु, भगतसिंग, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री.गुंदेचा बोलत होते.  याप्रसंगी  मंचचे अध्यक्ष कुतुबुद्दीन शेख, संचालक संजय घुले, प्रकाश वैरागर, बजरंग पवार, भाऊसाहेब विधाते, जयंत गायकवाड, शाम साठे, गोरक्ष दिवटे, विजय जगताप आदि उपस्थित होते.
श्री.गुंदेचा पुढे म्हणाले, समाजासाठी शेतकरी आणि मजूर महत्वाचे घटक शहिद भगतसिंग मानत होते. या दोन घटकांची लूट समाजाकडून त्यावेळी होत असत. अन्नधान्याची निर्मिती करणारा भुकेने मरत असत. जे मजूर सगळ्यांसाठी कपडे विणतात, त्यांच्या मुलांना मात्र अंगभर कपडे मिळत नव्हते. ज्यांनी शेतकरी व मजूर यांच्यासाठी बलिदान दिले तरी त्या शेतकर्‍यांचे व मजूरांचे आजही हाल होत आहे. त्यामुळे क्रांतीकारकांनी केलेल्या बलिदानानंतर ही त्यांचे स्वप्न आजही अपूर्णच राहिले. याचे वाईट वाटते, असे श्री.गुंदेचा म्हणाले.
प्रास्तविकात मंचचे अध्यक्ष कुतुबुद्दीन शेख यांनी क्रांतीकारकांची प्रेरणा समग्र परिवर्तन करु शकते. इतिहास हा घडत असतो, भुगोल हा बदलत असतो आजही युवकांनी इतिहासापासून प्रेरणा घेतली पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यानंतरच्या सर्व शहिदांचे स्मरण करणे काळाची गरज आहे; तरच पुढच्या पिढीला त्यांच्या बलिदानाचे महत्व समजेल. केवळ शहिद दिवस साजरा करुन चालणार नाही तर ते का शहिद झाले, त्यांची प्रेरणा सर्वांनी घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
यावेळी कासिफ शेख व अब्दुल हादी शाबीर या विद्यार्थ्यांनी शहिद राजगुरु, भगतसिंग, सुखदेव यांच्या विषयी महिती आपल्या मनोगतामधून दिली. शेवटी संजय घुले यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments