Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एमपीएससीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी काँग्रेसचा मोर्चा

 
ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- : रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने जाहीर केला आहे. या निर्णयाविरोधात अहमदनगर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा नगर शहरात काढण्यात आला. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. 
यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे उत्कर्ष झावरे, जाहिद शेख, सुजित जगताप, प्रशांत जाधव, सचिन वारुळे, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, स्वप्नील पाठक, उद्धव माने आदींसह काँग्रेस पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. 
बालिकाश्रम रोड येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या वेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. मोर्चामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा निलक्रांती चौका मध्ये आला त्यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको करण्याची भूमिका घेतली. 
मात्र पोलिस प्रशासनाच्या आवाहनानंतर सामंजस्य दाखवत निलक्रांती चौकातच आंदोलकांनी ठिय्या मांडला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना तीव्र भावना व्यक्त केल्या. एमपीएससीचा निर्णय अन्यायकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा आणि विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची वाट मोकळी करून द्यावी असा एकसुरी आवाज आंदोलक विद्यार्थ्यांचा होता. 
यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की,  महा विकास आघाडी सरकार मध्ये काँग्रेस सहभागी असली तरी देखील एमपीएससीने घेतलेला निर्णय हा निश्चितच अत्यंत चुकीचा आणि विद्यार्थ्यांना देशोधडीला लावणारा आहे. विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा एमपीएससीने कदापि पाहू नये. आपल्या निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा याही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर शहरामध्ये करण्यात येईल, असा इशारा यावेळी काळे यांनी दिला. 


काळे यांची सत्यजीत तांबे, 
जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा
आंदोलकांच्या भावना सरकार आणि प्रशासना पर्यंत पोहोचविण्यासाठी किरण काळे यांनी आंदोलन सुरू असतानाच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दूरध्वनी करून आंदोलकांच्या भावना सांगितल्या. सत्यजित तांबे यांनी याबाबत आपण सरकारशी चर्चा करणार असून काँग्रेस पक्ष हा स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांची भूमिका सरकार पर्यंत पोहोचवली जाईल अशी ग्वाही दिली. 


महसूल मंत्री ना.बाळासाहेब 
थोरात यांच्याशी चर्चा करणार 
राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याशी आपण चर्चा करणार असून त्यांच्या माध्यमातून एमपीएससीला निर्णय बदलण्यासाठी भाग पाडले जाईल असे किरण काळे यांनी सांगितले आहे. वेळप्रसंगी विद्यार्थ्यांच्या हितासाठी तीव्र स्वरूपाची भूमिका काँग्रेस घेईल अशी भूमिका काळे यांनी मांडली आहे. 

Post a Comment

0 Comments