ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडून वाहने भाड्याने चालवण्यासाठी घेतले जात. ती वाहने परस्पर गहाण ठेवून फसवणूक करणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 2 कोटी 69 लाख रुपयांच्या 16 आलिशान कार जप्त करण्याची ही महत्त्वपूर्ण कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. दादा उर्फ शशिकांत मारुती सातपुते (वय 26 रा. भोयरे गांगर्डा ता. पारनेर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मार्च ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये इनोव्हा, क्रिस्टा, इटींगा, झेस्ट अशा एकूण 22 कार महाबली एन्टरप्रायजेस या नावाने भाड्याने चालवण्यासाठी घेतलेल्या होत्या. यापैकी 9 कार आरोपी सातपुते यांनी परत केल्या. परंतु उर्वरित 13 कारचे भाडे व सदरच्या 13 कार परत केल्या नाहीत. त्या कारबाबत काही माहिती न दिल्याने पिसोळ ( जि. पुणे) येथील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे महेश प्रताप खोबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शशिकांत सातपुते याच्याविरुद्ध सुपा पोलिस ठाण्यात भादवी कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेरमध्ये दादा सातपुते याचा शोध घेऊन त्याला पोलिसांनी अटक केली. पारनेर न्यायालयात त्याला हजर करून अधिक तपासासाठी वेळोवेळी न्यायालयाकडून पोलिस कस्टडी घेतली. या दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी सातपुते याच्याकडून 16 आलिशान कार जप्त केल्या.
यापैकी इनोव्हा क्रिस्टा (एमएच 12 केएन 9940 ) ही कार एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात जप्त केली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सोमनाथ दिवटे हे अधिक तपास करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, सफौ नानेकर,पोना सुरेश माळी, रविंद्र सोनटक्के, शंकर चौधरी, दीपक शिंदे, पोकाँ रवींद्र घुंगासे, मयूर गायकवाड, रोहित येमूल, रणजित जाधव, मेघराज कोल्हे, चापोहेकाँ उमाकांत गावडे, संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
0 Comments