Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक ; २१ पैकी चार जागा आतापर्यंत बिनविरोध झाल्या असून त्यातील तीन विखेंच्या ताब्यात

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर:  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नसते, असे सांगण्यात येते. यावेळी मात्र भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे स्वरूप या निवडणुकीला प्राप्त होत असतानाच वेगळ्या राजकारणाचेही दर्शन होऊ लागले आहे. जामखेड तालुका सेवा सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे विखे समर्थक जगन्नाथ राळेभात यांची बिनविरोध निवड झाली तर पाथर्डी तालुक्यातही एका उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपच्या आमदार मोनिका राजळे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. २१ पैकी चार जागा आतापर्यंत बिनविरोध झाल्या असून त्यातील तीन विखेंच्या ताब्यात गेल्या आहेत.

नगरच्या जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवड आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत पुढील आठवड्यापर्यंत आहे. ही निवडणूक सुरू झाली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घातले.
ही निवडणूक नेहमी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांमध्येच रंगते. सध्या थोरात यांचे बँकेवर वर्चस्व होते. यावेळी विखे यांनी भाजप आणि आपले मूळ समर्थक यांच्या मदतीने सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे पवार कुटुंबीयांनीही लक्ष घालून महाविकास आघाडीला ताकद देण्याचा प्रयत्न सुरू केली.
आता मात्र, राजकारण बदलत आहे. आज जामखेडमधून राष्ट्रवादीचे भोसले यांनी माघार घेतली. आपण आमदार रोहित पवार यांच्या सांगण्यावरून माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्याच सूचनेवरून आपण माघार घेतली, असे भोसले सांगत आहेत.
भोसले यांच्या माघारीने राळेभात बिनविरोध निवडून येत आहेत. ते म्हणाले की आपण विखे समर्थक आहोत आणि त्यांचेच समर्थक राहणार. मात्र, जामखेड तालुक्यात आमदार पवार यांना साथ देणार. त्यामुळे हे नेमके काय राजकारण सुरू आहे. जामखेडमध्ये विखे आणि पवार यांचे सहमतीचे राजकारण सुरू आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर पाथर्डी तालुक्यातील एका विखे समर्थक उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे भाजपच्या राजळे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
२१ पैकी आता चार जागा बिनविरोध झाल्या. त्यातील एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर तीन जागी विखे समर्थकांनी बाजी मारली आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत अद्याप बाकी आहे, त्यामुळे उरलेल्या काळात काय काय होते, निवडणूक झालीच तर अंतिमत: कोण बाजी मारणार याबद्दलची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.


Post a Comment

0 Comments