Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना प्रादुर्भाव ओसरताच लोकशाही दिन उपक्रम पुन्हा सुरु ; जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या थेट संवादाने तक्रारदारांच्या चेहर्‍यावर उमटले समाधानाचे भाव

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर: कोरोना संसर्गाच्या काळात स्थगित करण्यात आलेला लोकशाही दिन आजपासून पूर्ववत सुरु झाला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा हा उपक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी यावेळी लोकशाही दिनात आलेल्या तक्रारदारांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. प्रशासकीय पातळीवर दाद मागितल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांनीच दिल्याने तक्रारदारांच्या चेहर्‍यावरही समाधानाचे भाव उमटले.
तब्बल ९-१० महिन्यांनंतर आज प्रथमच लोकशाही दिन उपक्रम आयोजित करण्यात आला. यासाठी अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. सुरुवातीला यापूर्वी आलेल्या तक्रारींचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतला. संबंधित विभागांनी त्यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचा जलदगतीने निपटारा करण्याचा आणि त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी लोकशाही दिनात तक्रार मांडण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी त्यांचा विषय समजावून घेतला तसेच संबंधित विभागप्रमुखाला त्या तक्रार अर्जाची प्रत देत त्यावर तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या. तसेच, नागरिकांनीही लोकशाही दिनाचे बदललेले स्वरुप लक्षात घ्यावे. सुरुवातीला तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी होणार्‍या लोकशाही दिन उपक्रमात त्यांच्या समस्या-अडचणी मांडाव्यात. त्या समस्यांच्या अनुषंगाने तालुका पातळीवरील विभागांनी दिलेल्या उत्तराने समाधान झाले नसेल तर तेथील टोकन क्रमांकासह जिल्हास्तरीय लोकशाही दिनात समस्या मांडावी, असे सांगितले.
या लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट विषयांसंदर्भातील तक्रारी दाखल करु नये. केवळ वैयक्तिक विषयांच्या अनुषंगाने कोणत्या विभागासंदर्भातील समस्या आहे, त्या अनुषंगाने अर्ज करावा, असे यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. निचित यांनी सांगितले.    


                                             


Post a Comment

0 Comments