Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमुळे शहरी भागाच्या विकासाला गती : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

 

महानगरपालिका आणि नगरपालिका-नगरपंचायतींच्या विकासाला चालना देणार ; पिंपळगाव माळवी येथील जागेवर अॅम्युझमेंट पार्क अथवा फिल्म सिटीसंदर्भात  प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश
ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर: यापूर्वी राज्यात महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्यासाठी स्वतंत्र विकास नियमावली असल्याने विकासाला खीळ बसत होती. राज्य शासनाने आता एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू केल्याने या विकासाला गती मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. अहमदनगर महानगरपालिकेच्या मालकीच्या पिंपळगाव माळवी  येथील जागेवर अॅम्युझमेंट पार्क अथवा फिल्म सिटी तयार करण्यासंदर्भात सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

श्री. शिंदे यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात अहमदनगर महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायती अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी व विकास कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे. आमदार निलेश लंके, महापौर बाबासाहेब वाकळे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. शिंदे म्हणाले, या युनिफाईड डीसीआर मुळे महानगरपालिका क्षेत्र आणि नगरपालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी आता विकासकामे करणे सुलभ होणार आहे. याशिवाय, अनावश्यक परवानग्या कमी झाल्याने कामाला गती येणार आहे तसेच अनधिकृत बांधकामांना आळा बसणा आहे. या नियमावली अंतर्गत सुविधा क्षेत्रात दवाखाना, ज्येष्ठ नागरिकांसाठी घरे, प्रकल्पग्रस्तांसाठी घरे, सभागृह, सुविधा केंद्र आदींचा अतिरिक्त वापरास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीच्या नियमावलीनुसार असणारे इमारतीमधील खोल्यांची मोजमापे, खोलीचे क्षेत्रफळ आदी बाबींवर असणारे निर्बंध काढून इमारत मालकाच्या सोईनुसार खोलीचे क्षेत्रफळ आणि वापरास परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या नियमावलीनुसार, आता १५० चौ.मी. पर्यंतचे भूखंडावरील बांधकामासाठी अर्जदाराने परवानाधारक अभियंता अथवा वास्तुविशारद यांच्यामार्फत बांधकाम नकाशे नियमानुसार असल्याचे प्रमाणपत्रासह नकाशे आणि विकास शुल्क भरल्याची पावती संबंधित प्राधिकरणाकडे सादर केल्यास त्या अर्जाची पोचपावती हीच बांधकाम परवानगी गृहित धरण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, १५० ते ३०० चौ.मी, मधील भूखंडासाठी विकास शुल्क आणि इतर आवश्यक भरणा झाल्यावर प्रस्तावास १० दिवसात बांधकाम परवाना देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली, चटई क्षेत्र निर्देशांकाच्या परिगणनेत बदल करण्यात आल्याने सर्व प्राधिकरणांमध्ये आता यासंदर्भात एकसमान धोरण झाल्याचे ते म्हणाले.
या नियमावलीमध्ये शेती विभागात आता काही बाबींसाठी वापर अनुज्ञेय करण्यात आला असून ०.१० हा चटई क्षेत्र निर्देशांक आता वाढवून ०.२० इतका करण्यात आला आहे. तसेच जमीन मूल्याच्या २० टक्के अधिमूल्य जमा करुन १.०० या मर्यादेपर्यंत तो अनुज्ञेय असणार आहे. त्यामुळे याठिकाणी मंगल कार्यालय,लॉन, शैक्षणिक व वैद्यकीय संस्था, प्रधानमंत्री आवास योजना, शासकीय व निमशासकीय तसेच शासन नियंत्रित संस्थांच्या इमारती तसेच प्रकल्पग्रस्तांच्या आणि गावाच्या पुनर्वसनासाठी वसाहत, स्वतंत्र ७/१२ क्षेत्रामध्ये वैयक्तिक धारणाक्षेत्रासाठी १५० चौ.मी. क्षेत्राचे घर, नगररचना योजना किमान २० हेक्टर क्षेत्रासाठी आदी बाबीसाठी वापर करता येणार आहे, याशिवाय, टुरिस्ट होम, रिसॉर्टस, हॉटेल्स, इको टुरिझम क्षेत्रासाठी त्याचा वापर करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  या नियमावलीमध्ये अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक ही नावीन्यपूर्ण संकल्पना अंतर्भूत करण्यात आली आहे.
महानगरपालिका क्षेत्रामध्ये ७० मीटर पर्यंत म्हणजे अंदाजे २ ते २३ मजले, नगरपालिका व नगरपंचायती आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये ५० मीटर म्हणजे १४ ते १६ मजले इतक्या उंचीच्या इमारती या नियमावलीनुसार अनुज्ञेय करण्यात आल्या आहेत. या इमारतींसाठी आता त्यासंदर्भातील शिफारशींची आवश्यकता राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रहिवास विकास परवानगीबाबतही या नियमावलीमुळे सूसुत्रता येणार असल्याचे नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. महापालिका हद्दीपासून २ किमी पर्यंत, नगरपालिका हद्दीपासून १ किमीपर्यंत आणि नगरपंचायत हद्दीपासून ५०० मीटर अंतरापर्यंत रहिवास विकास परवानगी अनुज्ञेय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
👉महानगरपालिका आणि नगरपालिका-नगरपंचायतींना विकासासाठी निधी
अहमदनगर महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासाठी ५ कोटी, सावेडी येथील नाट्यगृहासाठी ५ कोटी निधी देण्याचे यावेळी नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले. तसेच, महानगरपालिका आणि नगरपालिका व नगरपंचायतींनी रेंगाळलेली कामे आता गतीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना तसेच भुयारी गटार योजना वेळेत मार्गी लावावी. ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतींनी भुयारी गटार आणि पाणीपुरवटा योजनांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले नाहीत, त्यांनी ते तात्काळ सादर करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. विविध नगरपालिका आणि नगरपंचायतींकडून आलेल्या मागण्याबाबत त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे नमूद केले.
अहमदनगर महानगरपालिका आणि सर्व नगरपालिका आणि नगरपंचायती संदर्भात जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. भोसले यांनी सविस्तर सादरीकरण केले. अमृत अभियान अंतर्गत अहमदनगर पाणीपुरवठा योजना,  पाणीपुरवठा संदर्भात अंतर्गत वितरण व्यवस्था,  शहर भुयारी गटार योजना, सौर ऊर्जा प्रकल्प, शहरात हरित पट्टे विकसित करणे, घनकचरा व्यवस्थापन, आदींबाबतची सविस्तर माहिती त्यांनी दिली. यावेळी महापौर वाकळे तसेच महानगरपालिकेतील इतर पदाधिकारी यांनीही विकासकामांसंदर्भात विविध मुद्दे मांडले.
नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) योजनेतील विविध प्रकल्प, त्याची सद्यस्थिती आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या आवश्यक बाबी यांची यावेळी त्यांनी माहिती दिली.  आमदार आशुतोष काळे, आ. लहू कानडे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, शशीकांत गाडे, मनोज कोतकर, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, सुरेखा कदम  यांच्यासह संबंधित नगरपालिका -नगरपंचायतींच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी विविध विकासकामांसंदर्भात श्री. शिंदे यांच्याकडे मागणी केली.
या बैठकीस उपायुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे यांच्यासह मनपातील विविध विभागप्रमुख, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments