ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई - भिवंडी शहरामध्ये दिवसा जिममध्ये व्यायामाचे प्रशिक्षण देत असणारेच, रात्री घरफोड्या करणारे चोरट्यांसह 9 जणांना जेरबंद करण्याची कारवाई शांतीनगर पोलिसांनी केली आहे.
भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत दि.१४ फेब्रुवारी रोजी एक खानावळ चालकाच्या कार्यालयात घुसून आरोपींनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून चाकूने वार करून जखमी केले. जवळील तीन मोबाईल चोरी केल्याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात जबरी दरोडयाचा गुन्हा दाखल झाला होता. या दाखल गुन्ह्याचा पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, नितीन पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कसीलास टोकले, पो उपनिरीक्षक निलेश जाधव, रवींद्र पाटील, कर्मचारी शेळके, चौधरी, इथापे, वेताळ,काकड, वडे, मोहिते, इंगळे, पाटील यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती आधारे सापळा लावून चोरट्यांना पकडण्यात आले. या तपास दरम्यान दरोड्याचा गुन्ह्यातील सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असता, पोलिस खाक्या दाखविताच त्याच्याकडून शांतीनगर येथील दोन व निजमपुरा येथील एक अशा तीन गुन्ह्यांची आरोपींनी कबुली दिली.
विशेष म्हणजे या गुन्ह्यातील तीन आरोपी हे जिम ट्रेनर असल्याचे उघड झाले. यात ते दिवसा युवकांना व्यायामाचे प्रशिक्षण देऊन रात्री घरफोड्या करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या सोबत पाच घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये अजून तीन जणांना ताब्यात घेतले आहेत. त्यामध्ये एक विधिसंघर्षग्रस्त बालक ,एक महिला यांचा समावेश आहे, असे एकूण नऊ आरोपींना पोलिसांनी जेरबंद करण्यात आले आहे. शांतीनगर पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा ,चाकु, ९ हजार रुपयांचे दोन मोबाईल २ हजार रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा त्या सोबत विविध पाच घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करीत एक लाख २० हजार रुपयांचे ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम , १५ हजार रुपयांचे मोबाईल असा २ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
0 Comments