Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संगमनेर तालुक्यातील दाढ येथील बिबट्याच्या वावरासंबंधी वनविभागाचे स्पष्टीकरण

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील दाढ (खुर्द) येथे दिनांक ०९ जानेवारी रोजी नानाभाऊ वाघमारे यांच्या वस्तीवर बिबट्या आढळून आल्याची माहिती मिळताच तात्काळ कार्यवाही करत रात्री २-३० वाजता त्याठिकाणी  पिंजरा लावण्यात आला. घटनास्थळी बिबट्याचा वावर असल्याचे आणि दोन शेळ्या मारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याची माहिती संगमनेरचे (भाग-३) वनपरिक्षेत्र अधिकारी एच. एस. पारेकर यांनी दिली. यासंदर्भात सोशल मीडिया तसेच काही प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून 'सहा बिबट्याचा धुडगूस, महिलेसह शेळ्यावर केला हल्ला' अशा आशयाचे वृत्त छापून आले होते. ते वृत्त दिशाभूल करणारे तसेच वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. दरम्यान, वन्यप्राण्याने शेळ्या मारल्याच्या प्रकाराचा पंचनामा करण्यात आला असून शासन नियमानुसार नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. नानाभाऊ वाघमारे  यांनी दूरध्वनीवरुन वनपाल पानोडी आणि वनरक्षक पानोडी यांना कळविल्यानंतर रात्री २-३० वाजता तेथे पिंजरा लावण्यात आला. कोणत्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला असता, श्री. वाघमारे यांनी सदर महिला घरातून बाहेर आली नाही. त्यामुळे ती बचावली, असे वनकर्मचार्‍यांना सांगितले. श्री. वाघमारे यांनी वनविभागाच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकारी अथवा वनमंत्री यांना दूरध्वनी केला नाही. मात्र, प्रसारित मजकुरात यासंदर्भातील चुकीची माहिती दिली गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वास्तविक, बिबट हा वन्यप्राणी कधीही समुहाने राहात नाही. त्यामुळे सहा बिबटे एकत्र येण्याचा प्रश्नच नाही. घटनास्थळी देखील एकाच बिबट्याचा ठसा आढळून आला आहे, असे श्री. पारेकर यांनी दिलेल्या खुलाशात म्हटले आहे.  

Post a Comment

0 Comments