भारतवासियांचा आनंदाचा
दिवस : आ. संग्राम जगताप
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : संपूर्ण विश्वातील मानव जातीवर कोरोना संसर्ग विषाणूचे महाभयंकर संकट आले होते. संसर्गजन्य असलेल्या या विषाणूचा प्रसार स्पर्शातून अतिशय वेगाने होत होता. विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण अत्यावस्थ होऊन दगावण्याचे प्रमाण वाढले होते. या विषाणूवर कुठल्याही प्रकारचे औषध नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानंतर जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती. आपल्या देशात मात्र केंद्र व राज्य सरकारने याबाबत कठोर निर्णय घेत निर्माण झालेल्या परिस्थितीला भक्कमपणे तोंड दिले. तातडीच्या उपाययोजना केल्या. या विषाणूचा प्रसार व संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करावी लागली. या सर्व उपाय योजनांमुळे जगामध्ये आपल्या देशाने कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी आघाडी घेतली आहे. देशातील शास्त्रज्ञांनी व तज्ज्ञांनी यावर औषध व लस शोधण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. संपूर्ण देशवासियांच्या शुभकामनांच्या जोरावर अखेर प्रभावी लस शोधण्यास आपला देश यशस्वी झाला. आज सबंध मानवजातीसाठी आनंदाची बाब म्हणजे या विषाणूवरील यशस्वी झालेल्या लसीचे प्रत्यक्ष लसीकरण सुरु झाले आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
शासनाच्या निर्देशानुसार कोविशील्ड लसीकरणाचा शुभारंभ महापालिकेच्या बुरुडगाव रोड येथील जिजामाता दवाखान्यात अंगणवाडी सेविका ज्योती लवांडे यांना पहिली लस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत देण्यात आली. यावेळी आ. संग्राम जगताप, उपमहापौर मालन ढोणे, स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, महिला बालकल्याण समिती सभापती लता शेळके, उपसभापती सुवर्णा गेणप्पा, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, नगरसेविका मीना चोपडा, संजय चोपडा, बाळासाहेब पवार, विजय गव्हाळे, डॉ. अनिल बोरगे, डॉ. बापूसाहेब कांडेकर व आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, शासनाच्या निर्देशाप्रमाणे आज जिल्हाभर ३७ हजार १५६ आरोग्यसेवकांना कोविशिल्ड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये शहरातील ७ हजार ५00 आरोग्यसेवकांना कोविशिल्डचे तीन आठवड्यांच्या अंतराने दोन डोस देण्यात येणार आहे. सर्व सामान्यांच्या मनातील कोरोना विषयीची भीती दूर होऊन जनजीवन पूर्वपदावर येणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
0 Comments