Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर अर्बन बॅंकचे दिलीप गांधीसह संचालक मंडळ, संबंधित अधिका-यांवर कोतवाली गुन्हा दाखल

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - सुमारे दीड-दीड कोटीच्या दोन संशयास्पद नोंदी करून ३ कोटीचा अपहार केल्याबद्दल येथील नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेचे माजी अध्यक्ष व नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधींविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात माजी खा. गांधींसह त्यांचे संचालक मंडळ व संबंधित अधिकारीही आरोपी आहेत. कोतवाली पोलिसात दाखल झालेला हा गुन्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला जाणार असून, त्यांच्याद्वारे आता पुढील तपास होणार आहे. २०१७मध्ये घडलेल्या या अपहाराचा गुन्हा तब्बल ३ वर्षांनी दाखल झाला आहे.
ब्रिटीश कालखंडात १९१० मध्ये नगर अर्बन बँकेची स्थापना झाली आहे. बँकेच्या ४८ शाखा असून, राज्यात प्रमुख शहरांमध्ये या शाखा आहेत. ११० वर्षांची परंपरा असलेल्या या नगर येथील नगर अर्बन मल्टिस्टेट-शेड्यूल्ड बँकेत तीन कोटींचा अपहार केल्याबद्दल या बँकेचे माजी अध्यक्ष व नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह संचालक मंडळ सदस्य व तसेच बँकेच्या मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्याम बल्लाळ व कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीचे प्रोप्रायटर आशुतोष लांडगे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. ७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०१७ या काळात ही ३ कोटीच्या अपहाराची घटना घडली आहे.

नगर अर्बन बँकेत झालेल्या तीन कोटीच्या अपहाराबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद देण्याचे पत्र कोतवाली पोलिसांनी बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांना १० डिसेंबरला दिले होते. त्यानुसार त्यांनी बँकेच्या मुख्य शाखेचे शाखाधिकारी मारुती औटी यांना गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी होण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे औटी यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे, प्रमुख व्यवस्थापक सतीशकुमार रोकडे व महादेव साळवे यांच्यासमवेत कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलीसानी बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह संचालक मंडळ सदस्य, कर्जदार व बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कट रचून, संगनमत करुन, बँकेस खोटे कागदपत्र तयार करुन, बँकेच्या रकमेचा अपहार करुन ठेवीदार, सभासद यांचा विश्वासघात केलेला आहे. सदरील रकमा या श्री. आर. बी. कासार, मे. देवी एजन्सी व मे. गिरीराज एटरप्राइजेस, संगमनेर यांच्या खात्यात वर्ग करुन त्यांच्या खात्याद्वारे काढून घेवून वर नमुद केलेली बँकेच्या एकंदर रक्कम रुपये 3 कोटी रुपयांचा अपहार केला आहे. त्यांनी स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करुन अवास्तव व खोटे कर्ज मंजुर केलेले आहे व त्याद्वारे बँकेच्या रकमेची चोरी, अफरातफर व फसवणुक केलेली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 406, 420, 465, 467, 471 व 120 ब या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे नगर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. या अगोदर बँकेच्या संदर्भामध्ये कर्ज प्रकरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे व आता दुसरीकडे बँकेच्या संचालक मंडळाने प्रशासनाला हाताशी धरून अपहार केल्याच्या दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे बँकिंग क्षेत्रामध्ये चर्चेचा विषय झाला आहे. कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये
दाखल झालेला हा गुन्हा आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग होणार आहे व त्यांच्याकडून याबाबतचा पुढील तपास होणार आहे.

Post a Comment

0 Comments