Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेतकरी जन आंदोलनाचे दिल्लीतून नेतृत्व करण्यासाठी युवा शेतकऱ्यांचे अण्णा हजारेंना साकडे

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
राळेगण सिद्धी  : देशातील शेतकऱ्याला कायमस्वरूपी मोडून काढण्याचे काम केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांमुळे होणार आहे. यामुळे आमची पिढी बरबाद होईलच पण आमच्या इथून पुढे जन्माला येणा-या शेतकऱ्यांच्या सगळ्या पीढ्या देखील बरबाद होणार आहेत. तेव्हा जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकर्‍याला या बरबादी पासून वाचण्यासाठी आता आपणच दिल्लीमध्ये उपोषणाला बसावे, असे साकडे नगर, पारनेर तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन घातले आहे. 
तरुण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची समक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले. ॲड. योगेश गेरंगे यांच्यासह ॲड.अनिल धाडगे, ॲड. अजिंक्य काळे, सुनील आंबडे, शंकर चव्हाण, तुषार बांडे, प्रशांत जाधव, संदीप माळी, रवींद्र गीते, दिलीप पवार, रोहिदास पाटील, सतेज साळी आदी तरुण शेतकरी यावेळी उपस्थित होते. 
यावेळी हजारे यांना गळ घालताना तरुणांनी हजारे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी लवकरात लवकर दिल्लीमध्ये आपण उपोषणाला बसावे यासाठी आग्रह धरला. शेतकऱ्यांना कोणीही वाली उरलेला नसून हजारे हेच आता शेतकऱ्यांना पर्यायाने देशाला वाचवू शकतील, असा विश्वास यावेळी तरुणांनी व्यक्त केला.
मागील सुमारे वीस दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमध्ये दिल्लीच्या सीमेवरती हजारो, लाखो शेतकरी तळ ठोकून आहेत. परंतु देशातील शेतकरी आंदोलकांना अण्णा हजारे यांच्या सारखे सक्षम आणि प्रभावी नेतृत्व मिळाले तरच केंद्र सरकारचे डोके ठिकाणावर येईल, अशी बाजू यावेळी तरुण शेतकऱ्यांनी मांडली. नुकत्याच झालेल्या देशव्यापी भारत बंदला अण्णांनी देखील एक दिवसीय उपोषण करत पाठिंबा दिला होता. याबद्दल अण्णांचे आभार मानण्यात आले. 
🟦 नगर  जिल्ह्यातून हजारो तरुण 
शेतकरी दिल्लीला जाण्याच्या तयारीत
यावेळी बोलताना ॲड. योगेश गेरंगे म्हणाले की, देशातील तरुण शेतकरी आता हवालदिल झाला आहे. तो संतप्त झाला आहे. अण्णांनी या आंदोलनाचे नेतृत्व हाती घेतल्यास अण्णांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीकडे कूच करत अण्णां समवेत नगर जिल्ह्यातून तरुण शेतकरी हजारोंच्या संख्येने उपोषणासाठी जाण्याचा आमचा संकल्प आहे. 
गेरेंगे पुढे म्हणाले की, महात्मा गांधींच्या नेतृतवाखाली  जनसहभागातून झालेल्या चळवळीमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. अण्णा देखील या देशातील तरुणांसाठी आदरस्थानी आणि आशास्थानी आहेत. आता फक्त अण्णाच या आंदोलनाला देशव्यापी जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त करून देत शेतकऱ्यांना वाचवू शकतात. 
यावेळी अण्णा हजारे यांनी तरुण शेतकऱ्यांची बाजू समजावून घेत या बाबतीमध्ये लवकरच शेतकरी हिताची भूमिका मी घेईल असे आश्वासन दिले.


Post a Comment

0 Comments