Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बीड जिल्ह्याधिकारी कार्यालयात झालेल्या सर्व विभागांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

 


जिल्ह्याचा विकास केंद्रस्थानी ठेवून सतर्कतेने व गांभीर्याने काम करा, विकासाच्या वाटेत येणाराची गय करणार नाही - धनंजय मुंडे

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी काल (सोमवारी) परळीत सात तासांचा जनता दरबार घेतल्यानंतर आज (दि.२२) जिल्ह्यातील विविध विभागांच्या समग्र आढाव्यासाठी संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र तब्बल ८ तास चालवले. 
यामध्ये जिल्ह्यातील बोगस बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, कृषी विभागातील रब्बी हंगामातील पेरणी, पीक कर्ज, अतिवृष्टी नुकसान, सहकार, पणन, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग, महिला व बालविकास, जल जीवन मिशन, कापूस व भरड धान्य खरेदी, बीड नगर परिषद यासह मत्स्यव्यवसाय विभागाचा समग्र आढावा घेतला. यावेळी आ. प्रकाशदादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संजय दौंड, आ. संदीप क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, जि. प.उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, शिवाजी सिरसाट, यांसह जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांसह त्या-त्या विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील विकास कामांचा वेग वाढण्याची गरज असून सदर कामे पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी सतर्कतेने आणि गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज असून यामध्ये दिरंगाई आढळल्यास संबंधितांवर थेट कारवाई करू, जिल्ह्याच्या विकासाच्या आड कोणि येत असेल तर त्याची गय करणार नाही, असा सज्जड इशारा यावेळी प्रशासकीय यंत्रणांना ना. मुंडेंनी दिला.
पालक मंत्री म्हणाले शासनाने कर्जमाफी द्वारे शेतकऱ्यांना दिलासा दिला होता, यामुळे यंदा खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील यंत्रणेने शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आणि नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी सभासदांना देखील पीक कर्ज वाटप होणे गरजेचे होते. परंतु आढावा घेताना 30 सप्टेंबर अखेर पीक कर्जासाठी चे जवळपास 4000 अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. सदर बाब गंभीर असून जिल्हा उपनिबंधक सहकार संस्था यांनी याबाबतची माहिती तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसह स्टेट बँक ऑफ इंडिया इतर सरकारी बँका द्वारे कार्यवाहीची माहिती 48 तासात तपशीलवार सादर करावी त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकल्याच्या अडचणी समोर येतील. यामध्ये दोषी असल्यास बँकांवर देखील कारवाई करण्यात येईल अग्रणी बँक व्यवस्थापकांनी यामध्ये लक्ष घालून तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश पालक मंत्री ना. मुंडे यांनी दिले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी देखील शासनाने मदत घोषित केली असून ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये आलेल्या अडचणी आणि सोयाबीन बियाण्यांच्या बाबतच्या तक्रारी केलेली कार्यवाही पीक विम्याचे मिळालेली भरपाई आदींच्या बाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याची गरज आहे. यातून शेतकऱ्यांना मदत व दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न असून संबंधितांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत असल्यास याची गंभीर दखल घेऊन कारवाई करू असे संकेत पालकमंत्री ना. मुंडे यांनी दिले

महावितरण चा आढावा - अतिरिक्त भर असलेल्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवायला डीपीडिसीतुन निधी देणार

महावितरणशी संबंधित एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प आय पी डी एस व एचपी डी एस चा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात 762 ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड वर काम करत असून, त्यांची क्षमता वाढविणे किंवा नवीन ट्रान्सफर बसविणेसाठी निधी उपलब्ध करताना आवश्‍यकतेनुसार डीपीडीसी तून अधिक निधी दिला जाईल असे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
याप्रसंगी आ. प्रकाश सोळंके , आ. संदीप शिरसागर, आ. बाळासाहेब आजबे, आ. संजय दौंड, जि.प.अध्यक्ष श्रीमती शिरसाट, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी विविध मुद्दे उपस्थित केले तसेच चर्चेद्वारे बैठकीमध्ये भाग घेतला. आय पी डि एस मधील प्रलंबित कामे अधिकाऱ्यांनी उभा राहून पूर्ण करून घ्यावीत, जिल्ह्यातील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पांना जागा मिळत नसल्यास ती आम्ही उपलब्ध करून देऊ परंतु नैसर्गिक स्रोताच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असेही या बैठकीत ना. मुंडे म्हणाले.
महावितरण कडील प्रलंबित क्षमता वाढविण्याची कामे, नवीन सबस्टेशनचे प्रस्ताव, यासह ट्रान्सफॉर्मरची मागणी याबाबतचा तालुकानिहाय अहवाल दोन दिवसात सादर करण्याचा सूचना यावेळी ना. मुंडे यांनी केल्या.

बीड बायपास वरील सर्व्हिस रोड सह अन्य कामांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक

आ. संदीप क्षीरसागर यांनी सुचवलेल्या बीड शहर बायपास वरील 12 किमी लांबीच्या सर्व्हिस रोडच्या कामासाठी निधी मिळण्यासाठी, तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या अन्य कामांना कालबद्ध रित्या पूर्ण करता यावे यासाठी येत्या आठवड्यात केंद्रीय मंत्री. मा नितीन गडकरी यांची वेळ मागितली असल्याचे ना. मुंडे म्हणाले. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे संचालक श्री. गाडेकर यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम आय आर बी कंपनी कडून तातडीने पूर्ण करून घ्यावे अशा सूचनाही ना. मुंडे यांनी केल्या.

स्थलांतरित बालकांचे वजन दर महिन्याला नोंदवण्याची विशेष मोहीम राबवा - स्थलांतरित बालकांच्या कुपोषणाच्या भीतीवर ना. मुंडेंच्या विशेष सूचना

महिला व बालविकास विभागाचा आढावा घेताना बीड जिल्ह्यात कुपोषित बालके आढळणे ही लाजिरवाणी बाब असून विविध योजना राबविण्याबाबत प्रशासकीय यंत्रणेचे अपयश असल्याचे ना. मुंडे म्हणाले. जिल्ह्यातून ऊसतोडणी साठी व अन्य कामांसाठी स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या शून्य ते पाच वयोगटातील मुलांच्या वजनाची व पोषणाची नोंद त्या त्या जिल्हा परिषद मार्फत प्रत्येक महिन्याला घेण्याबाबत विशेष मोहीम राबवावी असे निर्देश यावेळी ना. मुंडे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले. 

जलजीवन मिशन - 4 वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक घरी नळ जोडला जावा

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जलजीवन मिशन, त्यामध्ये लोकवर्गणी हा भाग श्रमदानामध्ये मोजला जावा या प्रमुख मुद्द्यास अधोरेखित करत ना. मुंडे यांनी येत्या चार वर्षात गाव, तालुका, जिल्हा असा समग्र आराखडा तयार करून, तो मंजुरीसह योग्य रीतीने राबवून जिल्ह्यात १००% घरगुती नळ जोडणीचे आपले उद्दिष्ट असल्याचे नमूद केले, तसेच त्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही संबंधितांना दिले.

कापूस, भरड धान्य खरेदी - उर्वरित केंद्रे दोन दिवसात सुरू करा

जिल्ह्यात सीसीआय चे 20 व पणन चे 19 केंद्रांवर सध्या कापूस खरेदी सुरू असून आणखी काही नवीन केंद्र येत्या दोन दिवसात सुरू करण्यात येत आहेत; तसेच नव्याने सुरू होणाऱ्या केंद्रांवर नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदत देण्यात येईल, असेही ना मुंडे म्हणाले.
काही ठिकाणी जिनिंग सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे अंतर कापून आपला कापूस इतरत्र वळवावा लागला, त्याची नुकसान भरपाई किंवा फरक रक्कम मिळावी यासाठी आपण केंद्रीय राज्य मंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही ना. धनंजय मुंडे यांनी सांगितले.
भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत आलेल्या प्रस्तावांचा तालुकानिहाय आढावा सादर करण्याचे निर्देश यावेळी संबंधितांना देण्यात आले.

बीड नगर परिषद - अधिकाऱ्यांना सांगितले नियम समजावून
आ. संदिप क्षीरसागर यांनी सुचवलेल्या व बीड नगर परिषदे अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेत असताना ना. मुंडेंच्या अनेक प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गायरान किंवा मालक नसलेल्या भोगवाटेदार जमिनीच्या प्रश्नावर तर ना. मुडेंनी संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण नियम समजावून सांगितला! याव्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाचे निर्देश व मार्गदर्शक सूचना याचीही ना. मुंडेंनी वेळोवेळी आठवण करून दिली.
भुयारी गटार योजनेतील काम तीन महिन्यात पूर्ण करावे, तसेच पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेतील घरे ही गरिबांसाठी असून त्यासाठी कोणालाही आपल्या खिशातला पैसा द्यायचा नाही; तरीही अनेक वर्षांपासून कामे रखडलेली आहेत, या दोन्ही योजनेतील रखडलेल्या कामांचा एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश ना. मुंडे यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह अधिकाऱ्यांची एक टीम अमृत पेय जल योजना व भुयारी गटार योजनेच्या प्रगतीपथावरील कामांची पाहणी करणार असून त्यानंतर याबाबत आणखी एक बैठक आयोजित करण्यात येईल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 
जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. दरम्यान 8 तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाच्या कामांमध्ये राजकारण किंवा प्रशासकीय स्तरावर आडकाठी आणणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही हे पुन्हा एकदा ना. मुंडे यांनी अधोरेखित केले आहे.

Post a Comment

0 Comments