Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

"ग्रंथालय आणि वाचन संस्कृतीतूनच आशयसंपन्न जीवनाची आस असलेला सुसंस्कृत समाज घडविणे शक्य "-अच्युत गोडबोले

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - माहिती तंत्रज्ञानाचे युग अवतरले असले तरी वाचनालये आणि वाचन संस्कृतीचे  औचित्य  कमी झालेले नाही.आशयसंपन्न जीवनाची आस असलेला सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी मुलांमध्ये बालवयापासूनच वाचन वेड रुजवावे लागेल ,असे प्रतिपादन प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले यांनी केले. स्नेहालय संस्थेतील इंग्रजी माध्यम शाळेत  'स्व.मातोश्री ताराबाई चि.कुलकर्णी ग्रंथालय आणि अभ्यासिकेचे काल श्री. गोडबोले यांनी  उद्घाटन केले.
यावेळी  पद्मश्री पोपटराव पवार,निवृत्त कुलगुरू डॉ. एस.बी.निमसे, मुंबई उच्च न्यायालयातील सामाजिक संस्था आणि संघटनांची भूमिका न्याय व्यवस्थेसमोर समर्थपणे मांडणारे वकील  उदय वारुंजीकर, स्नेहालय इंग्रजी माध्यम शाळेचे संचालक राजेंद्र शुक्रे,, सुरभी सौंदर्यप्रसाधने अकादमीच्या संचालिका सौ श्रुती मनवेलीकर, रोजगार प्रशिक्षणासाठी  शाळांमधून  काम करणाऱ्या लेंड अ हँड इंडीया ,संस्थेचे
महेश रसाळ, पुणे येथील  सामाजिक कार्यकर्ते  डॉ. प्रकाश शेठ , संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि वाचनवेड चळवळीच्या माध्यमातून झोपडपट्टी -आदिवासी पाडे आणि ग्रामीण भागात वाचनाची सवय रुजविणारे किरीटी श्यामकांत मोरे यांनीही यावेळी  संवाद केला. श्री. पवार म्हणाले की,पुणे येथील नेस वाडिया कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक आणि महारष्ट्र टॅलेंट सर्च तथा MTS या उपक्रमाचे संस्थापक असणारे गुरुराज कुलकर्णी यांनी  शिक्षणक्षेत्रात असाधारण योगदान दिले. त्यांना संस्कार आणि प्रेरणा देणाऱ्या मातोश्री ताराबाई यांच्या स्मरणार्थ  स्नेहालय मध्ये सुसज्ज ग्रंथालय आणि अभ्यासिका उभारून त्यांनी आपल्या आईची प्रेरणा अजरामर केली.
डॉ. निमसे म्हणाले की,सध्याच्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रश्नांचे गुंते सोडविण्यासाठी  प्रचलित चाकोरीच्या बाहेरील उपाय शोधून तेच योजावे लागतील. त्यासाठी एकीकडे ग्रंथालयातील अभ्यास  आणि दुसरीकडे समाज बदलाचा प्रत्यक्ष कार्यनुभव यांचा मिलाफ घडवावा लागेल.मातोश्री ताराबाई ग्रंथालय आणि स्नेहालय चे प्रत्यक्ष सेवाकार्य ,यातून जटील प्रश्‍नांची उकल होऊ शकेल.
यावेळी स्नेहालय कौशल्य विकास केंद्राचेही  उद्धाटन झाले. पुणे येथील श्रीमती सविता पटवर्धन - बोकील यांनी त्यांचे पती कै.संजीव बोकील यांच्या स्मरणार्थ उभारून दिलेल्या दुचाकी दुरुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन श्रीमती सविता यांनी  केले. स्नेहालय ची नुकतीच दिवंगत झालेली समर्पित कार्यकर्ती आकांक्षा सिताराम ढोरजकर हिच्या स्मरणार्थ  आकांक्षा स्मृती कौशल्य विकास केंद्राचे लोकार्पण पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. येथे मुलांना शालेय अभ्यासाबरोबरच  संगणक व मोबाईल दुरुस्ती,  बागकाम, सुतारकाम आदींचे प्रशिक्षण मिळणार आहे. नगर मधील प्रख्यात सुरभी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या संचालिका श्रुती मनवेलिकर यांनी स्नेहालयात सौंदर्यप्रसाधन प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. त्याचे उद्घाटन श्री. वारुंजीकर आणि डॉ. निमसे यांच्या हस्ते झाले.
उपक्रमासाठी मदत करणारे आर्किटेक्ट सौ.श्रुती आणि शशांक पवार,चित्रकार आशिष तेलंगुल ,शीतल घोडके, यांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रा.डॉ. दया भोर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या  यशस्वितेसाठी  शालेय समन्वयक सौ. कजोरी दास, संजय चाबुकस्वार, नितीन मोरे,दिपक माळवे, आणि शाळेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments