Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय पोषण माह: घराघरात पोषण उत्सव ; सुदृढ बाळासाठी पोषण आहार

 प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे व पत्र सूचना कार्यालय, मुंबई तर्फे वेबिनारचे आयोजन , आहारातून साधलेले आरोग्य, हा जीवनाचा पाया: तज्ज्ञांनी केले नमूद  
ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
  अहमदनगर, दि. १६-    राष्ट्रीय पातळीवर सप्टेंबर महिना हा 'राष्ट्रीय पोषण महिना' म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, अहमदनगर, प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र-गोवा राज्य), पुणे व पत्र सूचना कार्यालय (पश्चिम विभाग), मुंबई, तसेच महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले. 
     'राष्ट्रीय पोषण माह: घराघरात पोषण उत्सव | सुदृढ बाळासाठी पोषण आहार' विषयावरील या वेबिनारमध्ये एकात्मिक बालविकास योजना विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नगरकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम,  बालविकास प्रकल्प अधिकारी (घारगाव) वैशाली कुकडे, बालविकास प्रकल्प अधिकारी (वडाळा) सोपान ढाकणे, रिलायंस फाउंडेशनचे योगेश जोशी या सर्वांनी मार्गदर्शन केले.
  पत्र सूचना कार्यालयाचे (मुंबई) उपसंचालक राहुल तिडके यांनी, आपल्या प्रास्ताविकात, आहार हा व्यक्ती/कुटुंबाच्या आरोग्याचा पाया असल्याचे नमूद केले. पूर्वापार आपल्याकडे योग्य आहाराला अत्यंत महत्व असून, त्याला पूर्णब्रह्म संबोधले गेले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. बाळाचे पहिले अन्नप्राशन सोळा संस्कारांपैकी एक आहे आणि आपल्याकडे आहाराशी संबंधित सोहळे साजरे होतात, यावरूनच महत्व अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिकारशक्ती खूप चांगली असणे, याला अत्यंत महत्व असून, सोबतच स्वच्छता व कोरोना काळात 'एसएमएस' अर्थात 'सॅनिटाईझ, मास्क आणि सेफ डिस्टन्स' याला महत्व देण्याचे सुचविले. सरकार तुमच्या स्वयंपाकघरात येऊ शकत नाही, पण सरकार तुमच्यापर्यंत आणि तुम्ही स्वयंपाकघरापर्यंत अशी रचना लागू शकते, असेही ते म्हणाले.
श्रीमती नगरकर यांनी 'राष्ट्रीय पोषण आहार मोहिम: महत्व व आलेख' यावर प्रकाशझोत टाकला. गरोदर, स्तनदा माता, २ वर्षांपर्यंतची मुले हे केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले. वेबिनारमध्ये सहभागी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करताना त्यांनी, काम करताना कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, कुटुंबातील सदस्य संख्या, मातेची समज, तिच्या शंका याचा नक्की विचार करावा, असे सांगितले. तसेच, चित्रांचा, परिसरातील वयस्क महिलांच्या अनुभवाचा मार्गदर्शनासाठी लाभ घ्यावा, अशीही कल्पना त्यांनी मांडली. अहमदनगर जिल्ह्यातील लहानमोठ्यांचे रक्तक्षय निर्मूलन करून आरोग्याच्या सर्वच बाबतीत जिल्ह्याला कसे पुढे नेता येईल, प्रत्येक बालक सुदृढ कसे होईल, यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
  श्री.कदम यांनी जिल्ह्याचा 'राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम' कसा सुरु आहे, याविषयी सविस्तर माहिती दिली.
  श्रीमती कुकडे यांनी  'बाळाचे पहिले १००० दिवस' या विषयावर माहिती दिली. बाळाचे वजन, उंची डोक्याचा घेर, संपूर्ण शारीरिक वाढ आणि आईचे दूध यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे कुकडे यांनी यावेळी सांगितले. आपला प्राण हा अन्नमय आहे, त्यामुळे बाळाचा वरचा आहार देखील कसा असावा, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. 'सही पोषण, देश रोशन' या उक्तीचा उल्लेख करून त्यांनी देशकार्य म्हणून बालकांची समाजाने जबाबदारी घ्याची, असे आवाहन केले. 
    श्री. ढाकणे, यांनी 'कुपोषित बाळाचे व्यवस्थापन' याविषयी मार्गदर्शन केले. लहान मुलांच्या वजन व उंचीचे नियोजन करून कुपोषित बालकावर लक्ष दिले जाते, ग्राम बाल विकास केंद्राच्या माध्यमातून गावपातळीवर कुपोषित मुलांना दाखल करून, आरोग्य व आहार संहिता, औषधी यांद्वारे कशाप्रकारे उपचार दिले जातात, याची माहिती त्यांनी दिली.
   श्री.जोशी यांनी 'परसबागेचे व्यवस्थापन' याविषयी सादरीकरण केले. अंगणवाडी परिसरात परसबाग उभी करून माता व मुले यांना योग्य आहार देता येईल, अशी उत्तम कल्पना त्यांनी यावेळी सांगितली. रसायनयुक्त भाजीपाला टाळा आणि घरोघरी भाजी पिकवा, असे आवाहन त्यांनी सहभागींना केले.
  या वेबिनारमध्ये सुमारे २८०० व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. लोक संपर्क ब्यूरो, अहमदनगरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी या वेबिनारचे सूत्रसंचालन केले तर प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोचे व्यवस्थापक डॉ. जितेंद्र पानपाटील यांनी आभार मानले. 

Post a Comment

0 Comments