Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेस जिल्ह्यात प्रारंभ

 विविध पथकांच्या माध्यमातून घरोघरी तपासणी करण्यास झाली सुरुवात ; जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी-पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर दि. १५ - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या  'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेस आज जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली.  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या टाकळी खातगाव येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला. याशिवाय, प्रत्येक तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक पदाधिकारी  यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरुवात करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या पथकामार्फत या घरोघरी सर्वेक्षण मोहिमेस सुरुवात झाली.
टाकळी खातगाव येथे  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, तहसीलदार उमेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मांडगे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
      कोरोनाला हरवण्यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. आपापल्या भागातील जे नागरिक आजारी असतील किंवा त्यांना कोणती लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन उपचार घेतले पाहिजेत.  कोणत्याही प्रकारे आजार अंगावर काढू नका. या संसर्गाची साखळी आपण सर्वांनी मिळून तोडली पाहिजे. त्यादृष्टीनेच प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. या भूमिकेतून ही मोहिम सुरु करण्यात आली आहे, असे प्रतिपादन यावेळी विविध वक्त्यांनी केले.


  या मोहिमेत कोरोनादूत घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक तपासणी करुन त्यांची माहिती संकलित करणार आहेच. आज जिल्ह्यातील मोहिमेचा शुभारंभ टाकळी खातगाव येथून झाला. ही मोहिम २५ ऑकटोबरपर्यंत सुरु राहणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी अध्यक्षा श्रीमती घुले यांनी केले.
     कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गृहभेटी, तपासणी आणि कोमॉर्बीड आजारी व्यक्‍तींना उपचार आणि आरोग्य शिक्षण याद्वारे या साथीवर नियंत्रण आणण्यासाठीची ही मोहिम म्हणजे आपला आरोग्य जागर आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने स्वताची आणि त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क लावणे, सतत हात धुणे किंवा कोणत्याही बाह्य वस्तूला संपर्क झाला तर हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे आवश्यक आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कोरोनादूत ही माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहेत. आरोग्यविषयक जी खबरदारी बाळगण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ आणि कोरोना दूत देणार आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
 जिल्ह्यात घरोघरी जाऊन कोरोनादूत ही माहिती संकलित करणार आहेत तसेच तपासणी करणार आहेत. त्यांना नागरिकांनी स्वताहून सहकार्य केले पाहिजे. ही मोहिम सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आहे.  कोणताही नागरिका केवळ दुर्लक्षामुळे उपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने घेतली पाहिजे. विशेषता ग्रामीण भागात नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडणे थांबवले पाहिजे. स्वच्छताविषयक सवयींचा जागर आपण पुन्हा एकदा केला पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
   यावेळी उपस्थितांना 'कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मी स्वता माझ्या कुटुंबात, परिसरात लोकांना मास्क लावणे, आपापसात दोन मीटरचे अंतर ठेवणे, साबणाने वारंवार हात धुणे या सर्व गोष्टींसाठी प्रेरित करेन. कोरोनाच्या काळात कोणाशीही दुर्व्यवहार अथवा भेदभाव न करता सर्वांशी आपुलकीने आणि सद्भावाने वागेन. कोरोनाच्या लढाईत आपली ढाल म्हणून उभे असलेले डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, सर्व कार्यकर्ते यांचा मी सन्मान व समर्थन करेन व त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेन.' अशी प्रतिज्ञा देण्यात आली.
   आजारी व्यक्तींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी ही मोहिम  साहाय्यभूत ठरणार आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महानगरपालिका, ग्रामीण भाग, नगरपालिका क्षेत्र आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आरोग्य पथकांची स्थापना करुन त्यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती यांचे पदाधिकारी,सदस्य,  ग्रामपंचायतींचे सरपंच-सदस्य, अधिकारी-कर्मचारी यांचा या सहभाग या मोहिमेत असणार आहे,
 माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम दोन टप्प्यात होणार असून मोहीमेची पहिली फेरी दि.१५ ते दि.१० ऑक्टोबर या कालावधीमध्ये होईल आणि दुसरी फेरी दि.१४ ते २४ ऑकटोबर या कालावधीमध्ये होईल. पहिला फेरीचा कालावधी १५ दिवसांचा असेल तर दुसर्‍या फेरीचा कालावधी १० दिवसांचा राहणार आहे. दिनांक २५ ऑक्टोबर रोजी मोहिमेचा समारोप होणार आहे.

Post a Comment

0 Comments