Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आईच्या सांगण्यावरूनच मुलाचा खून !

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सातारा : पुणे- बंगळूर महामार्गानजिक खिंडवाडी येथील जंगलात तरुणाचा खून झाला. खून हा आईच्या सांगण्यावरूनच केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्ह्याचा तपास लावला. प्रकाश कदम (वय 30, रा. वळसे, ता. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी साहिल मुलाणी व प्रमोद साळुंखे (रा. देगाव, ता. सातारा) या दोघांना अटक करण्यात आली आहे, तर आई विजया सुदाम कदम हिलाही ताब्यात घेतले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, खिंडवाडीतील जंगलात विलासपूरच्या हद्दीत युवकाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलिस पथक तातडीने घटनास्थळी गेले. पाहणीमध्ये पोलिसांना या युवकाच्या डोक्‍याजवळ दगड आणि रक्त दिसून आले. त्यामुळे त्याचा खून झाला असावा, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोचले होते. सहायक पोलिस अधीक्षक समीर शेखही घटनास्थळी आले. गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाला या घटनेचा तातडीने तपास करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तपास सुरू केल्यानंतर पोलिसांसमोर धक्कादायक माहिती उघड झाली. संबंधित मृतदेह वळसे येथील प्रकाशचा असल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी संशयित म्हणून साहिल व प्रमोद या दोघांनाही अटक केली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत वेगळीच माहिती समोर आली. मुलाच्या खुनाची सुपारी दिल्याबद्दल पोलिसांनी प्रकाशच्या आईलाही बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. तिच्याकडे चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील आणखी तथ्य उद्या (ता. 3) दुपारपर्यंत समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुजित भोसले, दादा परिहार, सागर निकम, नितीनराज थोरात, सतीश पवार, संदीप कुंभार यांनी ही कारवाई केली.

असा केला खून... 
प्रकाश हा दारू पिऊन वारंवार त्याच्या आईला त्रास देत होता. काही वर्षे तो मुंबईमध्ये काम करत होता. मात्र, गावी आल्यानंतर तो परत जात नव्हता. गावातही काहीही कामधंदा न करत तो आईला शिवीगाळ करत होता. या त्रासाला त्याची आई कंटाळली होती. त्यामुळे आईने नात्यातील प्रमोदला प्रकाशला संपविण्यास सांगितले होते. त्यानुसार प्रमोदने त्याचा मित्र साहिलला बरोबर घेतले. 26 ऑगस्टला दुपारी तिघे जण दारू पिण्यासाठी खिंडवाडीतील जंगलामध्ये गेले. तेथे प्रकाशला दारू पाजली. त्यानंतर दोघांनी त्याचा गळा चिरला. त्याच्या डोक्‍यात दगड घातला.

Post a Comment

0 Comments