Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुरुजींच्या प्लॉटवर एजंटचा डल्ला ; डमी उभे करून केली खरेदी

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क / नगर रिपोर्टर 

अहमदनगर दि.१२- हिंगणगाव येथील सेवानिवृत्त शिक्षकाचा सुपा तालुका पारनेर येथे असलेला दोन गुंठ्याचा प्लॉट कामरगाव व सुप्यातील दोन एजंट नी संगनमताने आपल्याच नात्यातील व्यक्तीच्या नावे केल्याची घटना नुकतीच उघड झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, या शिक्षकाने २०१० मध्ये सुप्यात शहांजापूर रोडवर शासकीय दूध डेअरी जवळ सव्वा दोन गुंठ्याचा प्लॉट गट नंबर ८६/ब खरेदी केला होता, त्यांना मुलगा नाही दोन मुलीच आहेत , पाठीमागे आधार नाही हे बघून या दोन एजंट नी तो प्लॉट आपल्याच घरातील व्यक्तीच्या नावावर घेण्याचा घाट घातला, त्यासाठी या शिक्षकांच्या नावाचा डमी उभा करून खरेदी करण्यात आली. तसेच ७/१२ वर नोंदीही करण्यात आल्या.
विशेष म्हणजे या दोघांनी या शिक्षकाच्या घरी जाऊन आम्ही तुमचा सुप्याचा प्लॉट खरेदी केल्याचे सांगितले, मी प्लॉट विकलाच नाही तर तुम्ही तो कसा खरेदी केला असा प्रतिप्रश्न उपस्थित झाला, या शिक्षकाचे भाचे पारनेर पंचायतीचे उपसभापती आहेत, तसेच राजकीय वजनदार व्यक्ती असल्याचे निदर्शनास आल्यावर एकच खळबळ उडाली, व संबंधित व्यक्तीनी तो प्लॉट सदर शिक्षकास परत देण्याची तयारी दर्शविली, मात्र मी प्लॉट विकलाच नाही तर परत घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही असे ठणकावून सांगितले गुरुजींच्या या सडेतोड भूमिकेमुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहेत, आता गुरुजींनी गपचुप आपला प्लॉट परत घ्यावा म्हणून त्यांच्यावर परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती दबाव आणत आहेत.
या प्रकरणात गुंतलेले सर्वच लोक आता वेगवेगळ्या प्रकारे गुरुजींना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील पाच सहा दिवसापासून हा दबाव वाढत आहे, तेच तेच एकूण संताप होत आहे, तरीही गुरुजी शांत आहेत,मात्र त्यांची पत्नी व मुलगी प्रचंड दबावाखाली आहेत, आमच्या कुटुंबाची शारीरिक वा मानसिक हानी झाल्यास त्यास सर्वस्वी कामर गावातील सेवानिवृत्त शिक्षक एजंट व सुप्यातील सुप्रसिद्ध एजंट जबाबदार असतील असे आमच्या प्रतिनिधीस सांगितले.
कामरगावतील व सुप्यातील या एजंटनी कोट्यवधी रुपयांची माया जमवली असून, महसूल विभागाला हाताशी धरून ज्याच्या मागे कोणी नाही त्यांची संपत्ती बळकवण्याचे प्रकार चालवले आहेत असे सुपा परिसरातील नागरिक बोलत आहेत.
या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार दाखल करण्यात आले ली नाही, येन केन प्रकारे खरेदी तर केली, नोंदही लावली, आता काय करायचे अशी चिंता खरेदी घेणारे,देणारे, नोंदी करणारे,दस्त बनवणारे, साक्षीदार, यांच्यासमोर आहे. अशा प्रकारे खरेदी करणारे मोठे रॅकेट या परिसरात असून ते शोधून काढणे गरजेचे आहे, प्रकरण मिटवण्यापेक्षा त्याचा छडा लावून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी अशीच सर्व सामान्य जनतेची मागणी आहे.
या प्रकरणात गुरुजींच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी तो प्लॉट विकणारे,खरेदी करणारे,व्यवहार करणारे एजंट यांचेवर राहील त्यांना आम्ही सोडणार नाही, असेही त्यांच्या मुलीने यावेळी जाहीर केले.

Post a Comment

0 Comments