Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पांगरी हद्दीतील विहिरीतील ते सडलेले प्रेत ; आत्महत्या नसून खूनच तिघांना अटक

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क / नगर रिपोर्टर 

बार्शी दि.१३- पांगरी तालुका बार्शी शिवारातील जहानपूर रोडवरील त्या विहिरीत सडलेल्या बेवारस मृतदेहाच्या तपासात पांगरी पोलिसांना यश आले आहे. तिघांवर गुन्हा नोंदवून ठोकल्या बेड्या आहेत.
   याबाबत  पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी दि. ८ ऑगस्ट२०२० रोजी जहानपूर शिवारात जैनुद्दीन शेख राहणार पांगरी हे त्यांच्या शेतात गेले असता त्यांच्या विहिरीमध्ये अनोळखी इसमाचे प्रेत तरंगत असताना दिसले.सदर घटनेची माहिती त्यांनी पांगरी पोलिस स्टेशनला दिल्याने पांगरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्यांना पाण्यावर तरंगत असलेले कुजलेल्या अवस्थेत प्रेत दिसले. प्रेत कुजलेले असल्याने बाजेस दोरी बांधून वरती काढले व जागेवरच पंचनामा केला. आणि पांगरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ रवींद्र माळी व तोरड यांना घटनास्थळी बोलावून तिथेच प्रेताचे शवविच्छेदन ही केले होते.
     त्यावेळेस मयताचा लाईटच्या केबलच्या सहाय्याने गळा आवळला असल्याचे दिसत होते त्याच्या हातात पिवळ्या धाग्याची राखी बांधलेली होती त्याचा शर्ट व बनियान आणि बूट विहिरीवर ठेवलेला होता. सदर मयताने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचा बनावा करून ठेवला असल्याचे दिसत होते. एकंदरीत सदर प्रकार हा संशयास्पद वाटल्याने  पांगरी पोलिसांनी याबाबतचा तपास चालूच ठेवला पांगरी पोलिस ठाणे हद्दीतील सर्व गावातील पोलीस पाटलांना गोपनीय माहितीद्वारे राखी पौर्णिमेच्या दिवसापासून गावातील एखादी व्यक्ती बेपत्ता आहे का? अशी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पिंपळगाव (दे)तालुका बार्शी येथील पोलीस पाटील बाळासाहेब चांदणे यांनी त्यांच्या गावात तपास केला असता गावातील उत्‍तम नारायण कांबळे वय ५५ हा राखी पौर्णिमेपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. पोलिसांनी पिंपळगाव( द) येथे उत्तम कांबळे याच्या घरी जाऊन त्याच्या हातातील राखीचा फोटो दाखवला असता व त्यांच्या घरातील असलेली राखी दोन्ही ही सारख्याच दिसून आल्या त्याच्या शर्ट व बूट दाखवला असता तो मैताच्या नातेनातेवाईकांनी  ओळखला व सदर मयत हे उत्तम नारायण कांबळे हेच असल्याचे सांगितले.
   सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.सिद्धेश्वर मोरे , यांच्या मार्गदर्शनाखाली पांगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सुधीर तोरडमल यांनी दोन टीम  तयार करून तपास सुरू केला मयत उत्तम कांबळे यांना कोणी मारले व कशासाठी मारले. तो कोणा सोबत राहत होता ,व कोनासोबत काम धंद्ययास जात होता. याबाबत  मैताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले, की उत्तम कांबळे हा त्यांच्याच गावातील शिवाजी भिमराव बोकेफोडे यांच्याकडे गेली चार वर्षापासून सालगडी म्हणून काम करीत आहे.
   बेपत्ता झाल्या दिवशी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उत्तम कांबळे हा घरी झोपलेला असताना शिवाजी बोकेफोडे यांनी घरी येऊन त्यास मासे धरण्यास जायचे असे म्हणून बोलावून सोबत घेऊन गेला होता, असे सांगितले सदर माहिती मिळताच  सपोनि तोरडमल यांनी शिवाजी भीमराव बोकेफोडे यास ताब्यात घेऊन खाकीचा हिसका दाखवताच बोकेफोडे यांनी सांगितले की उत्तम कांबळे  हा माझ्या पत्नीची व माझ्या मुलीची सतत छेडछाड करायचा त्याचा राग म्हणून मी दिनांक ३ ऑगस्ट २०२० रोजी रात्री माझा मुलगा रवि शिवाजी बोकेफोडे व आबा उर्फ राहुल उद्धव माने आम्ही  तिघांनी मिळून उत्तम कांबळे यास त्या रात्री मासे धरायचे म्हणून पांगरी शिवारातील असलेल्या शेख यांच्या शेतातील विहिरीजवळ घेऊन गेलो आणि केबलने त्याचा गळा आवळून अगोदर खून केला व नंतर विहिरीत ढकलून दिले असल्याचे कबूल केले पांगरी पोलिस ठाण्यात या तिघांवर खुन करुन पुरावा नष्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून बेड्या घालून ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments