Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विश्वातील कोरोना महामारी निवारणार्थ श्रीक्षेत्र मढी येथे श्रीनवनाथ ग्रंथ पारायणाची सांगता ; श्रीकानिफनाथांच्या संजीवन समाधीस महाभिषेक

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - प.पू.कानिफनाथांची संजीवन समाधी असलेल्या श्रीक्षेत्र मढी ( ता. पाथर्डी ) येथील मंदिरात जागतिक महामारी कोरोनाच्या निवारणार्थ संकल्पपूर्वक करण्यात आलेल्या श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या नऊदिवसीय पारायणाची विधीवत सांगता करण्यात आली. पारायणाची सांगता श्रीकानिफनाथांच्या संजीवन समाधीस महाअभिषेकाने करण्यात आली, असे श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड व मिलिंद चवंडके यांनी सांगितले.
ते म्हणाले, जागतिक महामारी कोरोनाच्या संकटापासून जनतेचे संरक्षण होण्याच्या सद् भावनेने व श्रध्देने श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथाचे नऊ दिवसांचे पारायण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे देवस्थानमधील श्री.संजय मरकड यांच्याकडून सुमुहूर्तावर विधीवत ग्रंथ पूजा करून जागतिक महामारी कोरोनाचे समूळ निवारण व्हावे, यासाठी नऊ दिवसांचे पारायण करत असल्याचा संकल्प करण्यात आला. देवस्थानचे विश्वस्त श्री. मिलिंद चवंडके यांनी नगर शहरातील घनपाठी वेदमूर्ती श्री.सागर कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन घेत संकल्पाचा विधी शास्त्रोक्त पध्दतीने देवस्थानमध्ये करवून घेतला. विशेषतः भारतातील जनतेचे जागतिक महामारी कोरोनापासून संरक्षण व्हावे. भगवान श्रीदत्तात्रेयांनी आणि नवनाथांसह महासिध्दांनी कृपा करावी. कोरोनाच्या आरिष्टाचे समूळ निवारण व्हावे, यासाठी श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथाचे नऊ दिवसीय पारायण करत आहोत, असा हा संकल्प होता. संकल्प केल्यानंतर महामारी कोरोनाचे विश्वामधून समूळ निवारण व्हावे, अशी प्रार्थना श्रीनवनाथांना आणि सिध्दांना उच्चस्वरात करण्यात आली. या पारायण सोहळ्याची सांगता करताना श्रीकानिफनाथांच्या संजीवन समाधीला महाअभिषेक करण्यात आला. या महाअभिषेक सोहळ्याचे ऑनलाइन पौरोहित्य निवडुंगे येथील वेदमूर्ती श्री. दिनेश जोशी गुरूजी यांनी केले. सर्वश्री बाबासाहेब मरकड, संजय मरकड, अविनाश मरकड, पाराजी मरकड, राधु मरकड व काका निमसे हे देवस्थानमधील पुजारी आणि कर्मचारी महाअभिषेक सोहळ्यात सहभागी झाले होते.
दररोज चालणारे पारायण, आरती व महाअभिषेक सोहळा भाविकांना आपल्या घरी बसूनच देवस्थानच्या फेसबुकपोस्टवर लाईव्ह पहाण्यास मिळाला. अनेक नाथभक्तांनी या सुविधेचा लाभ घेतला.
नवनाथ भक्तांनी आपआपल्या घरी विश्वातील महामारी कोरोनाच्या निवारणार्थ श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण संकल्पपूर्वक करावे. परंपरेप्रमाणे गावातील मंदिरांमध्ये श्रावण महिन्यानिमित्त केल्या जाणा-या श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथ पारायण सोहळ्यातही विश्वातील महामारी कोरोनाचे समूळ निवारण व्हावे, अशी विश्वकल्याणाची प्रार्थना करावी, असे आवाहन श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यरत विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री.शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष श्री. सुनिलराव सानप, विश्वस्त श्री. आप्पासाहेब मरकड आणि श्री. मिलिंद चवंडके यांनी केले होते. या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकणासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश येथील स्त्री-पुरूष नाथभक्तांनी आपआपल्या घरी श्रध्देने व शुचिर्भूतपणे पारायण केले. आधी केले मग सांगितले या संतउक्तीप्रमाणे प्रथम आम्ही पारायण सेवा केली व मगच आवाहन केले असे देवस्थानचे उपाध्यक्ष श्री. सुनिलराव सानप व विश्वस्त श्री. मिलिंद चवंडके यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र मढी येथे प.पू.श्रीकानिफनाथांच्या संजीवन समाधी मंदिरात श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण निर्विघ्नपणे पार पडले. या पारायणाचा आणि महाअभिषेकाचा प्रभाव नगर जिल्ह्यात लगेचच जाणवू लागला असून कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होत चालले असून लागण झाल्यावर बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सामुहिकपणे केलेल्या नाथउपासनेचेच हे फळ असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष श्री.शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड आणि मिलिंद चवंडके यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments