Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्त केलेल्या एका डीआरडीओ मधील वैज्ञानिकाची प्रेरणादायी कथा

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

महिन्यातून अठ्ठावीस दिवस विदेशांचा प्रवास करणारा हा अवघे २१ वर्षांचे वय असलेला युवा आहे 'प्रताप'. फ्रान्सने त्याला त्यांच्याकडे नोकरी करण्याचे निमंत्रण दिले आहे. सोळा लाखांचा गलेलठ्ठ पगार, पाच शयनकक्षांचे घर, अडीच कोटींची दिमाखदार कार, अशा प्रलोभनपूर्ण प्रस्तावांनी अनेक संस्थांनी त्याला बोलावले. ह्या पठ्ठ्याने या सर्वांना सरळ नकार दिला.
आपले  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले, उचित पारितोषकाने त्याचा सत्कार केला आणि 'डी आर डी ओ' ला त्याला सामावून घेण्यास सांगितले.
या कर्नाटकातील मुलाने काय नेमके पटकाविले आहे ते पाहूयात.

पहिला भाग
कर्नाटकातील मैसूर जवळ कोडाईकुडी नावाच्या एका दुर्गम खेड्यात याचा जन्म झाला. त्याचे शेतकरी वडिल सुमारे दोन हजार रुपये कमवू शकत. 
याला बालपणापासूनच 'इलेक्ट्रॉनिक्स' मध्ये विशेष रस. हा प्रताप बारावीत शिकत असताना आसपासच्या सायबर कॕफेंच्या माध्यमातून त्याचा बोईंग ७७७, रोल्स रॉईस कार, अवकाश, हवाई प्रवास, अशा गोष्टींशी परिचय झाला. याने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांना याच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत शेकडो इमेल लिहिले आणि कळविले कि त्याला काम करायचे आहे पण कसचे काय अन् कसचे काय कुणीच दखल घेतली नाही.
प्रतापला खरेतर इंजिनियरिंग कॉलेज मध्ये शिकावे वाटत होते परंतु हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याने बी एससी (फिजिक्स)ला प्रवेश घेतला. हे ही त्याला सोडून द्यावे लागले. त्याला वसतीगृहाचे शुल्क भरता आले नाही म्हणून हाकलून देण्यात आले. तो मैसूर बसस्टँडवर झोपायचा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहात कपडे धुवायचा. त्याने एकलव्याप्रमाणे सी प्लसप्लस, जावा कोअर, पायथॉन या संगणक भाषा स्वतःच शिकल्या. अशातच त्याला ई वेस्ट पासून 'ड्रोन' बनविण्याबद्दल कळले. सुमारे ऐंशी खटपटीं नंतर त्याला असा ड्रोन बनविण्यात यश आले.

दुसरा भाग
आय आय टी दिल्ली मध्ये ड्रोन स्पर्धा आयोजित केली होती. प्रताप तिथे भाग घेण्यासाठी विना आरक्षित डब्यातून प्रवास करीत, त्याच्या गावरान कपड्यात, पोहोचला. त्याने *दुसरे पारितोषक* पटकावले.
त्याला सांगितलं गेलं की जपान मध्ये एक स्पर्धा आहे व त्याने त्या स्पर्धेत भाग घ्यावा. जपानच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी चेन्नईच्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने त्याच्या शोध निबंधाला मान्यता देणे आवश्यक होते. हा चेन्नईला प्रथमच जात होता. महत्प्रयासाने प्राध्यापक महाशयांनी त्याच्या निबंधाला काही शेरे देऊन मान्यता दिली. शेऱ्यात त्यांनी लिहिले कि शोध निबंध लिहिण्याची अर्हता याच्यापाशी नाहीय. प्रतापला जपानला जाण्यासाठी साठ हजार रुपयांची गरज होती. मैसूर मधील एका भल्या माणसाने त्याच्या तिकिटाची व्यवस्था केली. बाकीचे पैसे शेवटी प्रतापच्या आईच्या मंगळसूत्राच्या विक्रीतून उभे केले. त्याच्या पहिल्यावहिल्या विमान प्रवासाने प्रताप एकटाच टोकियोला पोहोचला. उतरला तेव्हा तिथल्या खर्चासाठी त्याच्यापाशी उरले होते केवळ चौदाशे रुपये. महाग असल्यामुळे त्याने बुलेट ट्रेनचे तिकिट काढले नाही आणि नियोजित गावापर्यंत पोचण्यासाठी सोबतच्या सामानासह त्याने सोळा ठिकाणी ट्रेन बदलत साध्या ट्रेनने प्रवास केला. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रताप आणखी आठ किलोमिटर सर्व सामान घेऊन पायी चालत गेला. एकशे सत्तावीस देशांचे स्पर्धक असलेल्या त्या महाप्रदर्शनात शेवटी त्याने भाग घेतला. निकाल गटागटाने आणि वरचे दहा क्रमांक राखून जाहीर होत होते.
प्रताप हळुहळू हताश होत मागे सरकत होता. निकाल जाहीर करणारे हळुहळू पहिल्या दहातील निकाल सांगत होते. सरकत सरकत तिसरा क्रमांक घोषित झाला. मग दुसरा... आणि घोषणा झाली 'आता स्वागत करूयात भारतातून आलेल्या सुवर्णपदक विजेत्या श्री. प्रताप यांचे' त्याच्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. तो डोळ्यांनी पहात होता अमेरिकेचा ध्वज खाली खाली सरकत आहे आणि भारताचा तिरंगा डौलाने वर वर सरकत आहे. प्रताप दहा हजार डॉलर्सनी सन्मानित केला गेला. सर्वत्र सत्कार समारंभ होऊ लागले. 
त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला. सर्व आमदार खासदारांनी सन्मान केला. फ्रान्सने त्याला मोठी नोकरी आणि मानपानाची साधने प्रस्तावित केली. प्रतापने फ्रान्सला सरळ नकार दिला. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले आहे आणि (डी आर डी ओ) "रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन" मध्ये त्याला सामावून घेतले आहे
भारतीय 'बलस्य मूलं विज्ञानं' चे व्रत घेऊन भारतमातेची सेवा करण्यासाठी.

Post a Comment

0 Comments