Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे दि.२९- पुण्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय पथक हे पाहणी आणि आढावा घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले असून, सर्व रुग्णालयांमध्ये क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) कॅमेरे बसविण्याच्या सूचना या पथकाने केल्या आहेत. पुण्यातील करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख कुणाल कुमार, सदस्य अरविंद कुशवाह आणि डॉ. सिमिकांता बॅनर्जी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी कुणाल कुमार यांनी सर्व रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केली.
या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होते.
कुणाल कुमार म्हणाले, ‘करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार रुग्णांवर उपचार केले पाहिजेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन यांच्यावरील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
रुग्णांना मानसिक उपचार देण्याबरोबरच लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरण करण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे’. ‘रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचे सखोल परीक्षण करून मृत्यूदर हा शून्यावर आणण्याची कार्यवाही करावी’ असेही कुणाल कुमार म्हणाले.
‘रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत; तसेच सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना लागू करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य कल्याण योजनेचा लाभ रुग्णांना देण्यात येत आहे’ असे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. ‘यापुढील ४५ दिवस हे महत्त्वाचे असल्याने प्रशासनातील प्रत्येकाने संकटकालीन योद्धा म्हणून काम करावे. प्रत्येक व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत’ असे आवाहन सौरभ राव यांनी केले.
पुण्यात नऊ हजार ३३२ खाटा उपलब्ध
जिल्ह्यात १४ ते २४ जुलै या दहा दिवसांच्या लॉकडाउनच्या काळात करोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच खाटा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे दहा दिवसांच्या काळात नऊ हजार ३३२ खाटा उपलब्ध झाल्या आहेत. १४ जुलैपर्यंत साध्या खाटांची संख्या ही १६ हजार ५७, ऑक्सिजनयुक्त खाटा दोन हजार २१६ आणि अतिदक्षता खाटा १९३ होत्या. खाटा उपलब्ध होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे २४ जुलैपर्यंत साध्या खाटांची संख्या २४ हजार १९४ पर्यंत पोहोचली.
ऑक्सिजनयुक्त खाटा या तीन हजार ३२३ झाल्या आणि अतिदक्षता खाटा या ६१५ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.Post a Comment

0 Comments