मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.८ - शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ पूर्णपणे मिळू शकला नाही. त्यातच आता खरीपाची लगबग सुरु झाल्याने शेतकर्यांना पुन्हा कर्ज मिळणे अवघड झाले आहे. शासनाने बँकांना आदेश देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होण्यास तयार नाही. जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी अद्यापर्यंत या कर्जमुक्तीपासून वंचित आहेत. याचा गांभिर्याने विचार करुन तात्काळ शेतकर्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, राज्यात सुद्धा हीच परिस्थिती असून, त्याची संख्या सुमारे 11 लाख इतकी आहे. वेळेत कर्ज मिळाले नाही तर पुन्हा शेतकरी अडचणीत येईल. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करु नये, अशी मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांपर्यंत अद्यापर्यंत पोहचली नाही. महाराष्ट्रातील जवळजवळ 11 लाख शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित आहेत. महाराष्ट्र शासनाकडे या कर्जमुक्तीसाठी लागणारा आवश्यक पैसा उपलब्ध नाही. म्हणून दि.22 मे 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने या कर्जमुक्तीबाबत एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार कर्जमुक्ती योजनेंतर्गत शासनाकडून प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये ज्या शेतकर्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम अद्याप जमा झालेली नाही, अशा शेतकर्यांच्या कर्ज माफीबाबत शेतकर्यांच्या कर्ज खात्यावर असलेली रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी व खरीप 2020 साठी शेतकर्यांस नवीन पीक कर्ज द्यावे, असे आदेश महाराष्ट्र शासनाने जारी केले आहेत. मात्र या आदेशानुसार जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामिण बँका कर्जमुक्तीपासून वंचित राहिलेल्या शेतकर्यांना नवीन कर्ज देण्यास तयार नाहीत. या बँकांना रिझर्व्ह बँकेने 8100 कोटींची हमी दिल्याशिवाय या बँका शेतकर्यांना कर्ज देण्यास तयार नाहीत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडून ही हमी या बँकांना तात्काळ देण्याची व्यवस्था केली तरच हा शेतकर्यांना कर्जमुक्तीबरोबरच चालू हंगामासाठी नवीन कर्ज मिळेल.
पावसाळा तोंडावर आहे, शेतकरी शेतीच्या मशागतीमध्ये व्यस्त आहेत. या खरीप हंगामासाठी बि-बियाणे, खते यासाठी शेतकर्यांना पैशाची आवश्यकता आहे. साधारणत: महाराष्ट्रातील कर्जमुक्तीपासून वंचित असलेल्या 11 लाख शेतकर्यांचा प्रश्न आहे. आणि शेतकर्यांची ही अडच सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने मार्ग काढण्याची आवश्यकता आहे.
याबाबत अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व विरोधीपक्ष नेते मा.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठवून यातून मार्ग काढून सर्व शेतकर्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून द्यावा, असे बेरड यांनी म्हटले आहे.
0 Comments