Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेतक-यांना बी-बियाणे योग्य वेळेत पोहचू द्या : विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.६- जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती सध्या तरी नियंत्रित आहे, पण तरीही येथील प्रशासकीय व वैदयकीय अधिका-यांनी वेळीच सावध होऊन पूर्णपणे खबरदारी घेण्याची गरज आहे, अन्यथा येथे सुध्दा मुंबई व पुण्यासारखी कोरोनाची स्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे अहमदनगरमध्ये करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वारांटाईनची स्थिती योग्य पध्दतीने हाताळावी लागेल असे स्पष्ट प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शनिवारी (दि.६) केले. तसेच शेतक-यांच्या बांध्यावर देण्यात येणारे बी-बियाणे योग्य वेळेत पोहचू द्या व कापूस,हरभरा, मका, तूर आदीं धानाची खरेदी गतीने करण्याची सूचना यावेळी दरेकर यांनी केली. 
विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज अहमदनगर जिल्ह्याच्या कोरोना परिस्थिती संदर्भात जिल्ह्यातील कृषी व वैदयकीय विभागाचे अधिकारी, तसेच पोलिस यंत्रणांच्या अधिका-यांची बैठक घेऊन कोरोनाची स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव सातपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) अरुण मुंडे, नगर शहर अध्यक्ष भैय्या गांधी, निवासी जिल्हाधिकारी निचते, जिल्हा कृषी अधिकारी जगताप, आरोग्य अधिकारी डॉ.सागळे, पोलिस विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. 
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर यांनी सांगितले की, आजच्या बैठकीत आरोग्य व्यवस्थेची माहिती व आढावा घेतला. यासाठी सुरु करण्यात आलेल्या उपाययोजना यंत्रणा पुरेशा आहेत का या संदर्भात सुद्धा तपशिलवार माहिती घेण्यात आली. त्यामुळे आज तरी या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही असे चित्र आहे, म्हणून आपण अधिकाऱ्यांना सावध केले व त्यांना सांगितले की, मुंबई- पुण्यामध्ये आज परिस्थिती अत्यंत भयंकर आहे, त्यामुळे आत्ता आपले नियंत्रण कडकपणे करण्याची आवश्यकता आहे व या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. 
शेवगावला एका मंगल कार्यालयात जे रुग्ण क्वारांटाईन केले होते, त्यामध्ये दोघांना कोरोना झाला. त्यामुळे आम्ही मागणी केली की, ज्या ठिकाणी संस्थात्मक पध्दतीने कोरोना रुग्ण आहेत व तेथे रुग्ण पॉझिटव्ह आढळला तर त्या ठिकाणी राहणा-या सर्वांची तपासणी करा. कारण तेथील दोन ग्रुप मध्ये कोरोना पॉझिटीव्ह असतील तर त्या ठिकाणी बाकीचे लोक प्रार्दुभावित होऊ शकतात, याबाबतची योग्य अमंलबाजवणी करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती दरेकर यांनी दिली. 
आजच्या बैठकीत शेतक-यांच्या विषयावर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना देण्यात येणारी बी-बियाणे बांधावर वेळेत गेली आहेत का, तसेच त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी खतांची उपलब्धता काय आहे, आदी गोष्टींची माहिती घेतली. त्याच बरोबर कापूस,हरभरा, मका, तूर आदींची खरेदी गतीने होत नाही अशी येथील समस्या आहे, त्यामुळे येथील सीसीआयचे सेंटर व फेडरेशनच्या माध्यमातून होणा-या खरेदीसाठी तात्काळ अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून १५ तारखेपूर्वी १०० टक्के खरेदी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मिसाबंदी कायदा मध्ये जे लोक होते त्यांच्या मानधनाचा विषय प्रलंबित आहे, याबाबत निर्णय होऊनही त्याची अंमलबाजवणी होत नाही तरीही हा प्रश्न लवकर सोडविण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्याची माहितीही दरेकर यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात आज ८० हजार रुग्ण असून एकट्या मुंबईत ४० ते ५० हजार रुग्ण आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. कधी रुग्णवाहिका नसल्याने तर कधी रुग्णालयाच्या दारात नेले व ऑक्सिजन लावायला बेड नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे, कधी व्हेंटिलेटर नसल्याने रुग्ण दगावतोय. केवळ पुरेशी यंत्रणा व व्यवस्था नसल्यामुळे बऱ्याच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येते. अशाप्रकारे, मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीला प्रशासनाचा हेळसांडपणा आणि निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला.
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका मांडली तर राजकारण करतो असा अपप्रचार केला जातो. तरी,वस्तुस्थिती मांडणे व उणिवा, त्रुटी,दोष दाखवून देणे राजकारण असेल तर आम्ही ते स्वीकारतो असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, राज्यात ९ मार्चला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. ९ मार्च पासून संभाव्य संख्या लक्षात घेता शीघ्रगतीने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र, तसे घडले नाही. म्हणूनच आज राज्यात हा आकडा वाढला आहे. रुग्ण वाढत आहेत म्हणून चाचण्या केल्या जात नाही. मोठ्या प्रमाणावर चाचणी केली तर हा कोरोनाचा आकडा वाढेल या भीतीपोटी लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे अशी टीकाही दरेकर यांनी केली.

Post a Comment

0 Comments