Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाला हरवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सेवाव्रती परिचारिकांचा सत्कार


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. १२ -कोरोना बाधितांवर उपचार करुन त्यांना बरे करण्यासाठी अथक आणि अहोरात्र सेवा बजावणार्‍या बूथ हॉस्पिटलमधील परिचारिकांचा आज जागतिक परिचारिका दिनी सत्कार करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असताना यामधील महत्वाचा दुवा असणार्‍या परिचारिकां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शहरातील इव्हेंजलीन बूथ हॉस्पिटल येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अतिशय धीटाई आणि त्याचबरोबर सेवाव्रती वृत्तीने येथील डॉक्टर्स आणि नर्सेस तसेच सर्व आरोग्य कर्मचारी येथे सेवा बजावत आहेत. आज जागतिक परिचारिका दिनी या परिचारिकांच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. 
प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांनी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या सेवेची आठवण करत सर्व परिचारिकांचे कौतुक केले व त्यांच्या सेवेबद्दल त्यांचे आभारही मानले. सर्व परिचारिकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. नर्सेस हि आरोग्य सेवेतील अतिशय महत्वाची व्यक्ती आहे. नर्स हि केवळ रुग्णांना उपचारच देत नाही तर आधारही देत असते. बूथ हॉस्पिटल हे अहमदनगर शहरातील अतिशय जुने हॉस्पिटल आहे. बूथ हॉस्पिटलने नर्सिंग प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सुरु केले. ८० वर्षांचा नर्सिंग सेवेचा इतिहास असणार्या बूथ हॉस्पिटलच्या नर्सेसचा सर्वानाच खूप अभिमान आहे. येथील नर्सिग सेवाने प्रेरित होऊन अनेकांनी नर्सिग सेवेची निवड केली, आजही रुग्ण डिस्चार्ज होऊन जातांना परिचारिकांचे त्यांच्या सेवेबद्दल आभार मानतात व त्यांचे कौतुक करतात, अशा शब्दांत मेजर कळकुंबे यांनी भावना व्यक्त केल्या.
सिस्टर सरला संसारे, सिस्टर सत्वशिला वाघमारे, सिस्टर मनिषा, सिस्टर शितल आणि ब्रदर विजय कसबे यांनी त्यांचे परिचारिका सेवेतील अनुभव सांगितले, ते सांगताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. त्यांचे अनुभव ऐकल्यावर त्यांच्या विषयी मनातील आदर अधिकच वाढला. स्वतःचा जीव धोक्यात घालून, परिवाराची चिंता न करता अहोरात्र त्या रुग्णांना सेवा देत आहेत. त्यांच्या या त्यागाचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे, अशा शब्दांत त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी बूथ हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments