Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले ५ हजारांहून अधिक ; परराज्यातील स्थलांतरित मूळगावी रवाना


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. ८ - लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या इतर राज्यातील विविध भागातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन तयार केले असून त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जात आहे. दिनांक ०३ मेपासून ते आतापर्यंत परराज्यातील ५ हजार २३४ स्थलांतरितांना त्यांच्या मूळगावी परत पाठविण्यात आहे आहे. यात उत्तरप्रदेशमधील सर्वाधीक ३ हजार ९०३ स्थलांतरीतांचा समावेश आहे.
केंद्र आणि राज्य शासनाने स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि भाविकांना त्यांच्या मूळ राज्यात परतण्यासाठीची व्यवस्था करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरु केली आहे. संबंधित तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पोलीस यंत्रणा, महानगरपालिका, नगरपालिका, राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग अशा विविध यंत्रणा यासाठी राबत आहेत. यामध्ये राजस्थानमधील १३४, मध्य प्रदेशमधील ११६३, झारखंड २५, आंध्र प्रदेश ०५ आणि तामिळनाडू येथील ०४ स्थलांतरितांना त्यांच्या गावी परत पाठविण्यात आले आहे. 
संबंधित स्थलांतरितांची माहिती गोळा करणे, हे स्थलांतरित कोणत्या राज्यातील आहेत, कोणत्या गावातील आहेत, याची माहिती घेऊन त्यांच्या मूळगावी परत पाठविण्यासाठी नियोजन तयार केले गेले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासाठी विशेष पथकाची स्थापना केली. उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांना पदसिद्ध नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले.
प्रत्येक उपविभाग आणि तहसील पातळीवर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी त्यांची यंत्रणा गतिमान केली. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी कामगारांना रेल्वे स्टेशनपर्यंत आणताना विशेष खबरदारी घेतली.
स्थानिक गावपातळीवर तसेच औद्योगिक आस्थापनांच्या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना घेऊन येण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली. काही सामाजिक संस्थांनीही त्यासाठी पुढाकार घेतला.
दूरचा प्रवास असल्याने प्रशासनाने या सर्व प्रवाशांसोबत नाष्टा-अन्न पाकीटे, पाण्याची बाटली दिली आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. नगर, पारनेर, राहुरी, जामखेड, कर्जत, शिर्डी, राहाता, कोपरगाव, संगमनेर तालुक्याच्या विविध भागात काम करणारे मजूर यांना त्यांच्या मूळगावी परत पाठविण्यात आले.  

Post a Comment

0 Comments