Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेतक-यांच्‍या शेतावर बियाणे उपलब्ध होणार - कृषि मंत्री दादाजी भुसेकृषि विद्यापीठामध्ये ऑनलाईन
 खरीप पीक परिसंवादाचा समारोप
 आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.22- महाराष्ट्रात खरीप हंगामाची तयारी कृषि विभागाने केलेली आहे. खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे पुरेशा प्रमाणात आहेत. 50 हजार मे.टन युरीयाचा बफर स्टॉक सरकार करत असून शेतक-यांनी यासंदर्भात घाबरण्याचे कारण नाही. शेतकरी बांधवांनी कमी लागवड खर्चात जास्तीत जास्त दर्जेदार शेतमालाची निर्मिती करावी. तयार झालेल्या शेतमालाची विक्री कृषि खात्याच्या सहकार्याने ग्राहकांना घरपोच करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल, जेणे करुन शेतकरी बांधवांना त्यांनी पिकविलेल्या शेतमालास रास्तभाव मिळेल. शेतक-यांच्‍या शेतावर बियाणे उपलब्ध करुन देणार, आम्ही स्वतःआठवड्यातून दोन दिवस शेतक-यांच्‍या शेतावर जावून शेतक-यांशी संवाद साधनार असे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
   महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन खरीप पीक परिसंवादाचे आयोजन राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठात करण्यात आले होते. या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.के.पी.विश्वनाथा होते. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.व्ही.एम.भाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक ढवण, डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, महाराष्ट्र राज्याचे कृषि आयुक्त डॉ. सुहास दिवसे, कृषि परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने,अटारी, पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, अधिष्ठाता डॉ.अशोक फरांदे, संचालक संशोधन तथा विस्तार शिक्षण डॉ.शरद गडाख,परिसंवादाचे सह संयोजक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे, संयोजन सचिव प्रा.माधव देसाई उपस्थित होते.
यावेळी श्री.भुसे शेतक-यांनी त्यांच्या मनोगतात केलेल्या मागण्यांसदर्भात बोलतांना पुढे म्हणाले की, गाव शिवारातील ओढे, नदी, नाले यावर बंधारे बाधण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेवू. पाटपाणी वाटपाच्या संदर्भात सर्व पाणी वापर संस्थांना सर्व शेतकर्यांना समन्यायी वाटप करण्यासंबंधी सांगण्यात येईल. भाडेतत्वावर वापरण्यासाठी प्रत्येक गावासाठी ट्रॅक्टर देवू, जेणेकरुन गावातील सर्व शेतकरी बांधवांना त्या ट्रॅक्टरचा उपयोग होईल. लहान औजारे कुटुबांना पुरवता आली तर त्यांची गुजरान त्याच्यावर होऊन त्यांना फायदा होईल. शेततळ्याच्या अस्तरीकरणासंबंधी लवकरच निर्णय घेवू. येत्या 10 दिवसात उर्जा विभागाचे नविन धोरण येत आहे. त्यामध्ये प्रत्येक शेतकर्याला सौरपंप पुरविण्यासंबंधी निर्णय घेवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
  कुलगुरु डॉ.के.पी.विश्वनाथा आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,यावर्षी विद्यापीठाने शेतकर्यांसाठी 1 हजार 900 क्विंटल बी-बियाणे,24 लाख फळपिकांची रोपे, 250 क्विंटल जैविक खते, 450 क्विंटल जैविक किटकनाशके विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विक्री केंद्रांवर उपलब्ध केलेली आहेत. यावर्षी चांगले पर्जन्यमान राहिल, पिकांची परिस्थिती चांगली राहिल व शेतकर्यांना त्याचा चांगला फायदा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी शेतकर्यांच्या पाठीशी राज्यातील सर्व कृषि विद्यापीठे, महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग खंबिरपणे उभा आहे असे सर्व शेतकर्यांना मी ठामपणे सांगतो असे यावेळी ते म्हणाले.
     यावेळी डॉ.दिवसे, श्री. माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या ऑनलाईन खरीप पीक परिसंवादाच्या समारोपाच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. शरद गडाख यांनी केले. याप्रसंगी मोहोळ, सोलापूर येथील विवेक माने व पलुस, सांगली येथील प्रमोद पाटील या शेतक-यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
      या दोन दिवसीय खरीप पीक परिसंवादात डॉ. सुनिल कराड, डॉ. एच.टी.पाटील,डॉ. बी.एस.रासकर, डॉ.सतिश जाधव, डॉ.श्रीकांत कुलकर्णी, डॉ.मधुकर भालेकर या शास्त्रज्ञांनी अनुक्रमे मका उत्पादन तंत्रज्ञान, बाजरी उत्पादन तंत्रज्ञान, ऊस पीक उत्पादन तंत्रज्ञान, द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान, डाळिंब उत्पादन तत्रंज्ञान, खरीप भाजीपाला पिके उत्पादन तंत्रज्ञान या विषयांवर शेतक-यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पंडित खर्डे यांनी तर आभार डॉ. शरद गडाख यांनी मानले. या दोन दिवसीय परिसंवादात राज्यातून 500 पेक्षा जास्त शेतकरी, कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विभागातील अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणुन डॉ.बाबासाहेब माळी, डॉ.सचिन सदाफळ, डॉ.भगवान देशमुख, डॉ. संग्राम काळे व प्रा.अन्सार अत्तार यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments