आँंनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी : तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पिक कर्जाच्या जाचक अटी शिथिल करून कर्ज वाटप कराव्यात, अशी मागणी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अँड प्रतापकाका ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
पाथर्डी तालुक्यात पर्जन्यमान खूप कमी झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गाला दुष्काळ परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. राज्य शासनाने कर्ज माफी जाहीर केली असून, सदर योजनेत काही शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली तर काही शेतकरी कर्ज माफीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ३१ मार्च २०२० पर्यंतचे व्याज बँकेकडे भरणा केला आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने सध्या शासनाने कर्ज वाटप सुरू केले असून, बँकाकडून कर्ज देताना सातबारा, ८ अ, अन्य कागदपत्रांची मागणी केली जात आहे. कोरोनामुळे सर्व ठिकाणी टाळेबंदी असल्याने सरकारी कार्यालय बंद आहेत. यात तलाठी कार्यालयासह महसूल विभागाची संबंधित कार्यालय बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांना उतारे मिळत नाहीत. या लाँकडाऊनच्या काळात सेतू सुविधा केंद्राबरोबर अन्य आँनलाईन सुविधा ही बंद असल्याने कागदपत्रे मिळत नाहीत, या अडचणीमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अवघड झाले आहे.खरीप हंगाम जवळ आल्याने मशागत, बी-बियाणे, खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचणी येत आहेत. टाळेबंदी संपेपर्यंत कागदपत्राची अट शिथिल करून बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटप करावेत, अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, कार्यकारी संचालक जिल्हा सहकारी बँक, जिल्हा उपनिबंधक, तालुका निबंधक, तहसीलदार यांना श्री ढाकणे यांनी दिले आहेत.
0 Comments