आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. २१ - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्ज अशी कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा (कोविड-१९ अर्थात कोरोना टेस्टलॅब) केवळ २० दिवसांत उभारण्यात आली असून इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अधिकृत मान्यतेनंतर कोरोना संदर्भातील चाचण्यांना लवकरच सुरुवात होणार आहे. तेथील व्यवस्थेची पाहणी राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली. आयसीएमआरची मान्यता लवकरच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी लॅब निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून या कामांवर लक्ष ठेवले असून वारंवार भेटी देऊन कामाची पाहणी केली आहे. तसेच अधिकार्यांना सूचना केल्या आहेत.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे आदी उपस्थित होते.
या कोरोना चाचणी लॅबमुळे जिल्ह्यातील कोरोना आजाराची लक्षणे असणार्या व्यक्तींची चाचणी लवकर करणे सोपे होईल आणि प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. चाचणीसाठी लोकांना इतर ठिकाणी जाण्याची गरज उरणार नाही. अधिकाधिक चाचण्यांची संख्या वाढल्याने वेळीच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयसीएमआरच्या मानकांप्रमाणे ही लॅब तयार करण्यात आली आहे. वेळोवेळी त्यांच्याकडून आलेल्या सूचनांप्रमाणे सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या असून या लॅबसाठी आवश्यक मनुष्यबळाची नेमणूकही करण्यात आली आहे. त्यामुळे, लवकरच अधिकृतरित्या चाचण्यांना सुरुवात होईल. सुरुवातीला पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा (एनआयव्ही) आणि नंतर लष्करी वैद्यकीय महाविद्यालय येथे सध्या कोरोना संदर्भातील चाचण्या केल्या जात आहेत.
0 Comments