Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजपातील नाराजी चव्हाट्यावर ; माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भाजपनेत्या पंकजा मुंडे यांच्यावर साधला निशाणा

पंकजांच्या दबावामुळे केंद्रानेही निर्णय बदलला, मला ते जमलं नाही : राम शिंदे

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई : भाजपातील नाराजी चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. काही दिवसांपूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली.यानंतर माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनीही आपल्या शैलीत जाहीर नाराजी मिडिया समोर व्यक्त केली. पण तत्पूर्वी त्यांनी भाजपनेत्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. पंकजा मुंडे यांच्या दबावामुळे ऐनवेळी रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली. पण आम्हाला असा अभ्यास करता आला नाही, असा दबाव टाकता आला नाही. भविष्यात पक्षाकडून न्याय मिळेल, असा विश्वास प्रा. शिंदे यांनी मिडियाशी बोलताना व्यक्त केला.

पंकजा यांनी जे सूचक ट्वीट केलं त्यानुसार केंद्रानेही आपला निर्णय बदलला आणि रमेश कराड यांना उमेदवारी दिली. निर्णय बदलायला लावता येईल, असा दबाव टाकणं आम्हाला जमलं नाही, असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. दरम्यान, राम शिंदे यांनीच पंकजा मुंडेंवर ही टीका केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राम शिंदे हे मुंडे कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जातात. पण त्यांनी पहिल्यांदाच थेट पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय.
भाजपमध्ये खदखद! माजी मंत्री राम शिंदे यांचा पंकजा मुंडेंना टोला
विधान परिषदेला उमेदवारी द्यावी अशी इच्छा होती, पण पक्षाने निर्णय घेतला नाही. भविष्यात न्याय मिळेल या दृष्टीने नेता काम करत असतो. त्यामुळे भविष्यातही आपला विचार केला जाईल, ही अपेक्षा आहे, असंही राम शिंदे म्हणाले. राम शिंदेंनी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती. त्यातून त्यांनी पंकजा मुंडे यांना जो अभ्यास जमला तो आम्हाला जमला नाही, असा उल्लेख केला होता. यावर अधिक स्पष्टपणे बोलताना त्यांनी रमेश कराड यांच्या उमेदवारीवरुन पंकजा मुंडेंवर निशाणा साधला.
‘विधान परिषदेसाठी जे इच्छुक उमेदवार होते, ते आता समजून घेतील आणि शिकतील,' असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. हाच धागा पकडून शिंदे यांनी ट्विट केलं. 'पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे मुंडे यांनी दोन दिवसांत चांगला अभ्यास केला. त्यामुळे कराड यांनी उमेदवारी मिळाली. मला आणि इतरांना असा अभ्यास जमला नाही,' असं शिंदे यांनी म्हटलं होतं.
विधानसभा निवडणुकीला मंत्री असलेल्या राम शिंदे यांचा कर्जत-जामखेडमधून पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. अगोदर मुंडे आणि नंतर फडणवीस यांच्या जवळ असलेल्या राम शिंदेंना पराभवानंतर विधान परिषदेची अपेक्षा होती.

पंकजा मुंडे यांची विधान 
परिषद निवडणुकीवर प्रतिक्रिया
पंकजा मुंडे यांना उमेदवारी न दिल्यामुळे मुंडे समर्थकांकडून जोरदार संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्वीट करुन प्रतिक्रिया दिली होती. आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद, असं ट्वीट त्यांनी केलं होतं.


 दि. २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून खडसे, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मोठे नेते इच्छुक होते. काहींची नावे नक्की झाल्याचेही पक्षाकडून सांगण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी चर्चेतील नेत्यांना डावलून पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली. यातील एकनाथ खडसे आणि राम शिंदे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments