Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाविरोधी लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला श्रीकानिफनाथ देवस्थानकडून २१ लाखांची मदत


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- कोरोनाविरोधी लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला श्रीक्षेत्र मढी येथील श्रीकानिफनाथ देवस्थान ट्रस्टकडून २१ लाखांची मदत नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्याकडे देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, विश्वस्त आप्पासाहेब राजळे व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार यांनी सुपूर्त केली. यावेळी देवस्थानतर्फे सध्या राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांचीही माहिती ना.तनपुरे यांना देण्यात आली. ती ऐकून ना.तनपुरे यांनी कानिफनाथ देवस्थानने सामाजिक कार्याचा आदर्शच उभा केला, अशा शब्दात या उपक्रमांचे कौतुक केले.
श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यरत विश्वस्त मंडळामधील अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड व मिलिंद चवंडके यांनी काटकसरीच्या, प्रामाणिक, पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या माध्यमामधून अल्पावधीतच वेगळेपणाचा ठसा उमटविला आहे.
संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात लढत असताना या राष्ट्रीय कार्यामधील सहभाग म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला २१ लाखांची मदत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या कार्यरत विश्वस्त मंडळाने घेतला. देवस्थानच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करण्यात आली आहे.
पाथर्डी येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीसाठी आलेले ना.प्राजक्त तनपुरे यांची खास भेट घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी श्रीकानिफनाथ देवस्थानकडून देण्यात आली तेव्हा स्वयंस्फूर्तीने मंत्र्यांच्या हाती धनादेश सुपूर्त करणारे हे देवस्थान जिल्ह्यामधील पहिलेच असेल, अशा प्रतिक्रिया उपस्थितांमधून कौतुकाने उमटल्या.
कोरोना महामारीबाबत जनजागृती करण्याचे कार्य देवस्थानने वाहन सेवेच्या माध्यमातून सुरू केलेच आहे. लाॅकडाऊनच्या कालावधीत ड्युटी बजावत असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, पोलिस बांधव तसेच गोर-गरीब गरजूंना श्रीकानिफनाथ देवस्थानमधील कर्मचा-यांमार्फत नाथप्रसाद पुरवण्यात येत आहे. गरजेप्रमाणे देवस्थानच्या अन्नछत्रमध्ये सर्व काळजी घेऊन तयार करण्यात आलेले दर्जेदार अन्नपदार्थ उत्तम पॅकिंग करून भुकेल्या गरजूंना ते जेथे आहेत तिथे पोहोच करण्यात येत आहेत. रूग्णालयातील रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना, रस्त्याच्या कडेला आसरा घेत असलेल्या निराधारांना, दरमजल करत निघालेल्या प्रवाशांना, परतीच्या मार्गावर असलेल्या ऊसतोडणी कामगारांना नाथप्रसाद पुरवण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे पंचक्रोशीसह नगर जिल्ह्यामधील नाथभक्तांमधून देवस्थानच्या या राष्ट्रीय कार्याचे व सामाजिक सेवेचे कौतुक होऊ लागले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव गावात व परिसरात होऊ नये म्हणून श्री क्षेत्र मढी येथील प.पू.कानिफनाथांचे संजीवन समाधी मंदिर दैनंदिन पुजाविधी व्यतिरिक्त दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले.
गुढीपाडव्यापासून सुरू होत असलेल्या नववर्षारंभी केलेले संकल्प सिध्दीस नेण्याचे व्यापक नियोजन देवस्थानच्या कार्यरत विश्वस्तांनी कर्मचारी वृंदांच्या सहकार्याने केले आहे.
देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड व स्थानिक विश्वस्त आप्पासाहेब मरकड यांनी देवस्थानमधील कर्मचारी वृंदांच्या सहकार्याने मढी गावामध्ये नुकतेच औषध फवारणीचे कार्य पूर्ण केले.
देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड व मिलिंद चवंडके यांनी दिलेल्या सुचनांनुसार देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड, कर्मचारी संजय मरकड, संतोष मरकड, अविनाश मरकड, सुरेश मरकड, विजय रासकर, अशोक मरकड, राधाकृष्ण मरकड, बबन मरकड, पाराजी मरकड, अर्जुन मरकड आणि शिवाजी मरकड हे या सामाजिक कार्यासाठी अथक परिश्रम घेऊ लागले आहेत. मढी परिसरातील लोकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments