Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ४०६ शेतकर्‍यांना १४६४ कोटींची कर्जमुक्ती


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.7: एकीकडे कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि इतर यंत्रणा व्यग्र असतानाही या यंत्रणांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे मात्र जिव्हाळ्याने लक्ष दिले आहे. त्यामुळेच राज्यात अहमदनगर जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सर्वांत चांगल्या पद्धतीने झाली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ४०६ शेतकर्‍यांच्या कर्ज आणि व्याज माफीची १४६४ कोटी रुपये रक्कम त्यांच्या बॅंकेकडे जमा करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत म्याकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, एकीकडे कोरोना संसर्गाचा मुकाबला जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा करीत आहे. मात्र, त्याचवेळी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना सोईसुविधा आणि विविध योजनांचा लाभही वेळेवर मिळावा, यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळेच विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत सहकार विभागाच्या मार्फत ३ लाख ४६ हजार शेतकर्‍यांची नावे अपलोड करण्यात आली होती. त्यातील २ लाख ५३ हजार ४५५ शेतकरी यासाठी पात्र ठरले. त्यातील २ लाख ४७ हजार २०२ शेतकर्‍यांच्या बॅंक खात्यांचे आधार प्रमाणीकरणही करण्यात आले. त्यानंतर लगेच कोरोना संकट आल्याने उर्वरित ६ हजार २३० शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण केवळ बाकी राहिले आहे. मात्र, आधार प्रमाणीकरण झालेल्या २ लाख ३९ हजार ४०६ शेतकर्‍यांच्या कर्जखात्यावरील १४६४ कोटी रुपयांची रक्कम संबंधित बॅंकेकडे जमा करण्यात आली आहे.
याशिवाय, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खात्यामध्ये प्रत्येक महिन्यात दरमहा पाचशे याप्रमाणे तीन महिन्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. जिल्हयातील या योजनेअंतर्गत ४ लाख ३८ हजार १३१ खातेधारक महिला आहेत. त्यांना याचा लाभ मिळणार आहे.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांनाही २ हजार रुपयांप्रमाणे रक्कम मिळणार असून या योजनेत जिल्ह्यात ६ लाख ९ हजार ७४१ खातेधारक आहेत.
अर्थात, जिल्ह्यातील नागरिकांनी पैसै काढण्यासाठी बॅंकासमोर गर्दी करु नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. संपर्क टाळावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणीही भुकेलेला अथवा उपाशी राहू नये, यासाठी शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत जेवणाची व्यवस्था केली जात आहे. जिल्ह्यात तालुका पातळीवरही आवश्यकतेनुसार केंद्र सुरु करण्यात आले असून यात राहुरी, पारनेर आणि कर्जतचा समावेश आहे. तसेच, स्वस्त धान्य दुकानांमार्फतही नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची सेवा आणि पुरवठा सुरळीत सुरु आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवठा निर्माण करुन कोणी काळाबाजार करीत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
सध्या कोरोना संकटामुळे जिल्ह्यात अडकलेल्या विविध ठिकाणच्या स्थलांतरित मजूर तसेच नागरिकांसाठी शेल्टर होम अर्थात निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. दोन हजाराहून अधिक नागरिक याठिकाणी असून त्यांना नाष्टा आणि जेवण पुरविण्यात येत आहेत. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी नगर शहरातील बडी साजन मंगल कार्यालय येथील निवारा केंद्रास भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनीही येथील व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करीत राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले.  

Post a Comment

0 Comments