Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

धर्मवीर छत्रपती शंभुराजांच्या पंचस्थळांचा सरकारने विकास करावा- शंभुसेना संघटना


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे : अवघ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी आपले संपूर्ण जीवनच समर्पित केले होते. त्यांच्या जन्मापासून ते शेवटच्या श्वासा पर्यंतचा शौर्यदायी, पराक्रमी व ज्वलंत इतिहासाचे अनेक गडकोट, साक्षीदार आहेतच परंतु त्यांच्या जीवनात अत्यंत महत्वाची असणारी प्रमुख पंचस्थळे शिव-शंभुभक्तांसाठी खुपच प्रेरणादायी असल्याने या प्रमुख पंचस्थळांचा सरकाने लवकरात लवकर विकास करुन पंचस्थळांना जोडणाऱ्या मार्गाला "छत्रपती संभाजी महाराज पालखी मार्ग" असे नामकरण करावे अशी मागणी किल्ले बहादुरगड (धर्मवीरगड) येथील शिर्के घराण्याचे वंशज व शंभुसेना संघटनेचे प्रमुख मा.दिपकराजे शिर्के यांनी केली आहे.
शंभुराजांची प्रमुख पंचस्थळे नेमकी कुठे-कुठे आहेत तसेच पंचस्थळांचे ऐतिहासिक महात्म्य जाणून घेत त्या पवित्र ठिकाणी कोणता विशेष इतिहास घडला तिथे कोणते दिवस स्मरण म्हणून आयोजित केले जातात अथवा करावेत, घटना केव्हा घडल्या त्याबाबतचा घटनाक्रम जगासमोर यावा या उद्देशाने शंभुतीर्थांचे महात्म्य थोडक्यात पाहुया..
       अवघ्या हिंदुस्थानातील शिव-शंभुसैनिकांसह शिव-शंभुभक्तांसाठी आदर्श प्रेरणादायी असणाऱ्या छत्रपती शंभुराजांची शंभु-पंचतीर्थ अर्थात या पंचस्थळामध्ये..1) किल्ले पुरंदर 2) श्रीक्षेत्र संगमेश्वर 3) पेडगावचा किल्ले बहादुरगड ( धर्मवीरगड )
4) श्रीक्षेत्र तुळापूर 5) श्रीक्षेत्र वढु बुद्रुक ही ठिकाणे असून या पंचस्थळांवर घडलेल्या घटनांच्या स्मरणार्थ विशेष दिवस ( दिन ) ही आयोजित केले जातात.
१ ) किल्ले पुरंदर हे ठिकाण शंभुराजांचे "जन्मस्थळ" असल्याने या स्थळावर तारखेनुसार 14 मे  ( तिथिनुसार जेष्ठ शुद्ध 12) रोजी छत्रपती शंभुराजांची जयंती म्हणजेच "जन्मदिन" आयोजित केला जातो.
२) श्रीक्षेत्र संगमेश्र्वर या ठिकाणी  अचानक घनघोर युद्ध झाले होते त्यामुळे हे ठिकाण "युद्धस्थळ" मानले जाते, छत्रपती शंभुराजांनी जीवाची पर्वा न करता निर्भीड योध्याप्रमाणे सर्वांग रक्ताने भिजले तरी देखील प्रचंड लढा दिला होता परंतु दुर्दैवाने राजेंना अटक झाली तरीही हा दिवस शिव-शंभुभक्त तारखेनुसार 1 फेब्रुवारी हा दिवस "योध्दा दिन" म्हणूनच स्मरण करतात.
३) पेडगावचा किल्ले बहादुरगड 
( धर्मवीरगड) हे ठिकाण शंभुराजांचे "शौर्यस्थळ" असून राजांना कोकणातील संगमेश्वर तेथे कैद केल्यानंतर बहादुरगडावर आणले होते त्याप्रसंगी राजांनी औरंगजेबासमोर शरणागती न पत्करता, अमिशाला बळी न पड़ता याउलट शंभुराजांनी औरंग्यास बाणेदारपणे प्रतिउत्तर देत राष्ट्रनिष्ठेसह धर्मनिष्ठे बद्दल आदर प्रेम व्यक्त करत मोठे शौर्य दाखवल्याने त्याप्रसंगी राजांची तेजस्वी नजर असलेले डोळे आणि सडेतोड बाणेदार प्रतिउत्तर देणारी जीभ छाटण्यात आली होती तरीही शंभुराजांनी औरंगजेबाला भिक घातली नाही त्या स्वाभिमानाच्या शौर्यदायी घटनेच्या स्मरणार्थ तारखेनुसार 15 फेब्रुवारी (तिथीनुसार फाल्गुन शुद्ध विनायक चतुर्थी ) शौर्यस्थळावर "धर्मवीर दिन" आयोजित केला जातो.
४) श्रीक्षेत्र तुळापुर या ठिकाणी औरंग्याच्या आदेशाने  शंभुराजांच्या शरीराचे अवयव धड़ावेगळे करत ठार केले असल्याने हे ठिकाण "बलिदानस्थळ" म्हणून ओळखले जाते, म्हणून बलिदानाच्या स्मरणार्थ तारखेनुसार 11 मार्च ( तिथिनुसार फाल्गुन अमावस्या ) हा दिवस "बलीदान दिन" म्हणून आयोजित केला जातो.
५) वढु बुद्रूक " या ठिकाणी शंभुराजांच्या मृतदेहाला अग्निसंस्कार दिला असल्याने हे "समाधीस्थळ" म्हणून प्रसिद्ध आहे या स्थळावर तारखेनुसार 11 मार्च ( तिथिनुसार फाल्गुन अमावस्या ) "पुण्य दिन" म्हणजेच "पुण्यतिथी" आयोजित केली जाते.
       म्हणूनच अवघ्या हिंदुस्थानातील तरुणांसाठी आदर्श असलेल्या छत्रपती शंभुराजांचे जन्मस्थळ, युद्धस्थळ, शौर्यस्थळ, बलिदानस्थळ, समाधीस्थळ 
ही पंचस्थळे सदैव प्रेरणादायी ठरत आहेत म्हणून प्रत्येकांनी पंचस्थळांनावर नतमस्तक व्हावे.
🌑ज्याप्रमाणे महादेवाचे भक्त श्रद्धेने बारा जोतिर्लिंग यात्रा करतात.
🌑नवनाथ सांप्रदयाचे प्रमुख नऊ नाथांचे नाथभक्त नवनाथांची नऊ ठिकाणांची यात्रा करतात.
🌑गणपतीचे भक्त अष्टविनायक यात्रा करतात.
🌑असंख्य भक्त चारधाम यात्रा ही करतात.
🌑देवीचे भक्त साडेतीन शक्तीपीठाची यात्रा करतात.
🌑अगदी त्याचप्रमाणे शिव-शंभुभक्तांनी ही देशभक्तिसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या शंभुराजांच्या पंचस्थळांना आवर्जून भेट देत माथा टेकवावा आणि आपल्या देशाच्या शत्रुस कसे प्रतिउत्तर दिले पाहिजे त्याबाबत नक्कीच आदर्श घ्यावा ही विनंती..
           -: शंभु-पंचस्थळ काव्य :-

किल्ले पुरंदरी बाळ जन्मला हीच शंभुमहती..!
आठवण म्हणून साजरी करतो आम्ही जयंती..!
शंभुराजांची पंचस्थळे,आम्हास प्रेरणादायी..||1||

संगमेश्वरी दिला लढ़ा फिकिर नाही अटकेची..!
शंभुसैनिक आठवण करेल त्या युद्ध दिनाची..!
शंभुराजांची पंचस्थळे,आम्हास प्रेरणादायी..||2||

शौर्य दाखवले किल्ले बहादुरगडी भीमेकाठी..!
पेडगाव राहील स्मरणात धर्मवीर दिनासाठी..!
शंभुराजांची पंचस्थळे,आम्हास प्रेरणादायी..||3||

तुळापुरी घटना झाली शंभुराजे बलिदानाची..!
हिंदुस्थानी स्मरण करतील बलीदान दिनाची..!
शंभुराजांची पंचस्थळे,आम्हास प्रेरणादायी..||4||

शंभुतिर्थ वढु-गावी समाधीवर पुष्पवृष्टी वाहु..!
जय शंभुराजे हा जयघोष पुण्यतिथिला गाऊ..!
शंभुराजांची पंचस्थळे,आम्हास प्रेरणादायी..||5||

शंभुसेना संघ आवाहन करते अवघ्या राष्ट्राला..!
लक्ष्मीकांत शिर्के मुजरा करतो शंभु-स्थळांला..!
शंभुराजांची पंचस्थळे,आम्हास प्रेरणादायी..||6||

            -: लेख़क :-
लक्ष्मीकांत गणपतराव शिर्के
मार्गदर्शक,शंभुसेना संघटना
एम.ए. (इतिहास) बी.एड
किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड)
मौजे-पेडगाव,तालुका श्रीगोंदा
जिल्हा- अ.नगर

Post a Comment

0 Comments