Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मढी येथील कानिफनाथांचे समाधी स्पर्श दर्शनास स्थगिती


कावड यात्रा, फुलबाग यात्रा रद्द ;
अन्नछत्रही बंद रहाणार
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - प.पू.कानिफनाथांची संजीवन समाधी असलेल्या श्रीक्षेत्र मढी ( ता. पाथर्डी ) येथील परंपरागत कावड यात्रा व फुलबाग यात्रा रद्द करण्याचा व नाथांच्या समाधी स्पर्श दर्शनास तूर्त स्थगिती देण्याचा तसेच दैनंदिन अन्नछत्रही बंद ठेवण्याचा निर्णय श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड, मिलिंद चवंडके आणि मढी ग्रामपंचायतच्या सरपंच रखमाबाई मरकड व उपसरपंच सौ.मिनाताई आरोळे यांनी संयुक्तपणे घेतला आहे.
श्रीक्षेत्र मढी येथे परंपरेप्रमाणे यात्रा महोत्सवाचे नियोजन प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आले होते. धार्मिक कार्यासाठी गर्दी होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासनाने पारित केलेल्या आदेश क्र.आव्यमपु/कार्या१९अ/१८८/२०२० शनिवार दि.१४ मार्च २०२० चा मान राखून श्रीक्षेत्र मढी येथील श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यरत विश्वस्त मंडळाने प.पू.श्रीकानिफनाथांच्या मुक्तव्दार समाधी दर्शनास म्हणजेच समाधी स्पर्श दर्शनास आणि दैनंदिन अन्नछत्र सेवेस पुढील शासकिय आदेश होईपर्यत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मुक्तव्दार समाधी दर्शन शुक्रवार दि.२० ते सोमवार दि.२३ मार्च २०२० दरम्यान सर्वांकरिता खुले ठेवण्यात येणार होते. तसेच नाथ प्रसादालयातील अन्नछत्र सेवा दररोज सकाळी ११ ते दुपारी २ व रात्री ९ ते १० या वेळेत करण्यात येत होती.
परंपरेप्रमाणे फाल्गुन वद्य अमावस्येला फुलबाग यात्रा होते. याच दिवशी निशाण भेटीचा सोहळा व प.पू.कानिफनाथांच्या संजीवन समाधीस कावडीकर स्वहस्ते जलाभिषेक करण्याची परंपरा होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मढीमधील पारंपरिक फुलबाग यात्रा व कावड यात्रा रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय कार्यरत विश्वस्त मंडळ व मढी येथील ग्रामपंचायतीने घेतला आहे. 
चैत्र शुध्द प्रतिपदेला प.पू.कानिफनाथांच्या संजीवन समाधीस होणा-या सामुदायिक महापूजा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी होणारी मोठी गर्दी टाळण्यासाठी हा सामुदायिक महापूजा सोहळाही रद्द करण्यात आला आहे.
कोरोना प्रतिबंधाची खबरदारी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये देवस्थान ट्रस्टने ग्रामपंचायत पदाधिका-यांशी व ग्रामस्थांशी चर्चा करून यात्रा महोत्सवातील हे निर्णय भाविक व ग्रामस्थांच्या हितासाठीच घेतले आहेत. महाराष्ट्रभरातून व महाराष्ट्राबाहेरून मढी येथे 
येणा-या भाविकांनी देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड, मिलिंद चवंडके, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड आणि सरपंच रखमाबाई मरकड व उपसरपंच सौ.मिनाताई आरोळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments