Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कर्तव्यदक्ष "महिला पोलीस"


सहा महिन्यांची तिची maternity leave संपली होती.तिनं ठरवले होते बिनपगारी झाली तरी चालेल पण रजा टाकायची. नाईलाज होता नवरा मिलिटरीत होता, सासू-सासरे वयस्क,आई-वडिलांना अजून स्वतःच्या मुलाचा संसार सजवायचा होता,बाळाच्या बाबतीत care taker वर किती विसंबून रहायचे?. "आणि सगळा पगार असाच जेवण,भांडी,फारशी,care taker वर खर्च केला तर प्रगती कधी करायची,भविष्याची तरतूद कशी करायची ?."
कधीतरी नवरा सुट्टीवर आल्यावर केलेली चर्चा बाजूलाच पडली. सकाळपासून बाळ तापाने फणफणले होते. ती पोलीस ठाण्यात गेली,आवारात सगळे कर्मचारी जमले होते.
"काय गं काय झालं ?"तिने सोबतच्या लेडी कॉन्स्टेबलला विचारले. "आजपासून २१ दिवस लॉकडाउन आहे,आजपासून आपण सगळे रस्त्यावर, सगळ्यांना हजर रहायला सांगितले आहे,सगळ्यांच्या रजा कॅन्सल". "काय गं तुझी रजा अजून किती दिवस आहे ?" "बाळ कसं आहे ?" "बाळाचे फोटो मस्त दिसतात गं" आजूबाजूला कोणकोण काय काय कौतुकाने बोलत होते,माहिती देत होते,तिच्या बाळाचे कौतुक करत होते. ती मात्र तिच्याच तंद्रीत होती.
नवरा देशासाठी सीमेवर लढत होता,देशासाठी काहीही करायला तयार होता. तिला आपल्या नवऱ्याचे केवढे कौतुक... तिने मोबाईल काढला ,सासूला फोन केला, "बाळाला तापाचे औषध द्या,....दोन्ही बाटल्यातील पाजा... मी येते संध्याकाळी... .........नाही सगळ्यांच्याच रजा रद्द झाल्यात..." सासू काय काय विचारत होती.
तिने आवंढा गिळला. "वरचं दूध पाजा....."तिने फोन ठेवला.ड्युटीवर हजर झाल्याचे रिपोर्टिंग केले आणि पॉईंटवर हजर झाली.
चौकात,रस्त्यावर सूचना देऊनही लोक ऐकत नव्हते, मग पोलीस बडवून काढत होते. सहा महिन्यांनी ती बाहेर पडली होती.डोक्यावर ऊन मी म्हणत होते,गरगरायला लागले होते.
कोणत्यातरी स्वयंसेवी संस्थेने सगळ्या पोलिसांना सरबत वाटला. वर्दळ कमी होती पण १००% लोक घरात बसले तरच करोना विरुद्धची लढाई जिंकणं शक्य होतं.
बाळ जागं झालं असेल. तिने पुन्हा सासूला फोन केला, "बाळाने वरचं दूध पिलं?.........." मग मीच का आणि कसा सरबत पिला ? माझं बाळ उपाशी असताना. तिने स्वतःच्या थोबाडात मारून घेतली.
रस्त्याच्या कडेला असलेल्या घरातून एक बाई बाहेर आली. एक जरी माणूस बाहेर पडला तर करोनाचा मुक्काम भारतात वाढणार होता.
ती हातातली काठी सरसावत त्या बाईच्या दिशेने गेली.तिने काठी उगारण्याच्या अगोदरच बाईने हात पुढे केला आणि तिच्या हातात ओढणी दिली. "अंगावर घे,पान्हा पाजरून ड्रेसच्यावर आलाय." तिच्यातल्या आईची घालमेल आणखीनच वाढली,छातीतून दूध टपटप गळू लागलं.
"मावशी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, घरातून कोणीच बाहेर पडू नका,तुम्ही घरात राहिला तरच आपण करोनाशी लढू शकतो." "आम्हाला पण आमच्या कुटुंबाकडे जायचे आहे" हे वाक्य मात्र तिच्यातल्या कर्तव्यदक्ष पोलिसाने स्वतःकडेच ठेवले.
डॉ. दिपाली प्रमोद काळे(साऊ)
अप्पर पोलीस अधीक्षक
श्रीरामपूर (अहमदनगर)

Post a Comment

0 Comments