Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ग्रामीण भागातील यात्रा, जत्रा, सप्ताह इ. उत्सवाच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे जमा होणारी लोकवर्गणी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी जमा करुन गावपातळीवरच वापरावी : अँड संतोष गायकवाड


आपला देश हा सण आणि उत्सवप्रिय देश आहे. अगदी २२ तारखेला मा. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी आवाहन करुन जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूच्या दिवशी सायंकाळी टाळ्या व थाळ्या वाजवून कोरोना विरुध्दच्या लढ्यात काम करणाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे देखील आपल्यातील काहींनी उत्सावाप्रमाणेच साजरा केला, यावरून टिका देखील करण्यात आली, तो भाग वेगळा, सांगण्याच तात्पर्य एवढच की, आपण उत्सवप्रिय लोक आहोत. वर्षभर येणारे सर्व सण, उत्सव, सार्वजनिक उपक्रम, थोर नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, सार्वजनिक उत्सव इ. सर्व मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या खर्चाने साजरा प्रत्येक व्यक्ती, समूह तसेच जाती आणि धर्म आपल अस्तित्व दाखवून ते सिध्द करत असतात आणि आपली संस्कृती, वारसा जपत असतात.
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उन्हाळा सुरु होताच ग्रामीण भागामध्ये यात्रा, जत्रा, सप्ताह इ. सुरु होतात आणि यासाठी अगदी राज्याच्याच नाहीतर जगाच्या काना-कोपऱ्यातून लोक आपल्या मुळ गावाकड येऊन यामध्ये सहभाग नोंदवितात. परंतू, यावर्षी मात्र जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळ यात्रा, जत्रा इ. साजरे होणारच नाहीत, तसेच ग्रामीण हरिनाम सप्ताह सारखे कार्यक्रम देखील रद्द झालेले आहेत. हे सर्व साजरे करण्यामागचा माणसाचा उद्देश सुख, शांती, समाधान मिळवून जिवनात आनंद मिळविणे हाच असतो. मग यासाठी माणूस खर्च किती होतो हे पाहत नाही. यासाठी गावोगाव कमिट्या तयार केल्या जातात आणि यामध्ये काम करणारी लोक देखील अत्यंत उत्साहाने काम करुन हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी झटत असतात पण यावेळी कोरोनाने सर्व परिस्थितीच बदलून टाकली. बहुतांश लोक याही उन्हाळ्यात गावाकड परतली ती आनंद साजरा करण्यासाठी, सुट्या आपल्या लोकांमध्ये घालविण्यासाठी नाहीतर कोरोनाच्या भितीने.
कोरोनाने यानिमित्ताने सगळ्याच देशांची वैद्यकिय क्षेत्रातील कुवत दाखवून दिली. याबाबतीत आपला भारत देश जगात ११२ व्या क्रमांकावर आहे, हे देखील बहुतांश लोकांना मिडियाच्या माध्यमातून प्रथमच समजले असेल. इटलिसारख्या आरोग्य क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या देशात कोरोनाने थैमान घातले आणि अनेकांचा बळी घेतला, ही परिस्थिती आपल्या सारख्या विकसनशील देशाला गांभिर्याने विचार करायला लावणारी आहे. यानिमित्ताने सोशल मिडियावर एक अत्यंत महत्वपुर्ण संदेश फिरत होता तो असा की, येणाऱ्या पिढीसाठी हॉस्पिटल, शाळा तयार करा. तसेच प्रत्येक मोठ्या देवस्थानला एक हॉस्पिटल सुरु करण्याची सक्ती करण्यात यावी वगैरे. म्हणजेच आरोग्याच्या विषयावर आपण आता गंभीर झाल्याच किमान सोशल मिडियावर दिसतय. 
मी दिनांक २८/०३/२०२० रोजी राज्याचे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री मा. ना. उध्दवजी ठाकरे आणि आरोग्यमंत्री मा. ना. राजेशजी टोपे यांना ई मेल व्दारे पत्र पाठवून ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधून या डॉक्टरांना वैयक्तिक सुरक्षा किट पुरविण्याबाबत सुचविले आणि सी.एस.आर. च्या माध्यमातून निधी उभा करण्याबाबत कळविलेले आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर डॉक्टरांवर अत्यंत खालच्या पातळीवर टिका करण्यात आली आणि काहींनी तर दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांना अगदी देशद्रोही ठरवावे अशी गंभीर मागणी देखील केली. ही अत्यंत गंभीर बाब आहे. शेवटी स्वतः डॉक्टर, त्यांच्याकडे उपचारासाठी येणारे रुग्ण, डॉक्टरांचे कुटूंब व त्यांच्या संपर्कात येणारे सर्वचजण या सर्वांच्या जीवनाचा/आरोग्याचा प्रश्न केवळ या डॉक्टरांकडे सुरक्षेची साधन उपलब्ध नसल्यामुळे होत आहे. या बाबीकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केल जात आहे. हे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील बऱ्याच डॉक्टरांनी मला फोन करुन त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि गंभीर विषयावर मा. मुख्यमंत्री आणि मा. आरोग्य मंत्री महोदयांचे लक्ष वेधल्याबाबत आभार मानताना त्यांच्या इतरही काही प्रश्नांवर भाष्य केले आणि मलाही लुटमार करणारे अशी जनमाणसात प्रतिमा असणाऱ्या डॉक्टरांच्या व्यथा समजल्या. खुप अडचणींचा सामना करत व्यवसाय करणारे (अपवाद वगळता) डॉक्टर खरतर कोणालाच समजलाच नाही.
आज कोरोनाच्या निमित्ताने डॉक्टरांकडून आपण खुपच अपेक्षा व्यक्त करत आहोत, आरोग्य सुविधांकडे लक्ष वेधत आहोत पण यासाठी सर्वसामान्य नागरीक म्हणून आरोग्याच्या बाबतीत अगदी मी स्वतः देखील यापुर्वी काहीच योगदान दिलेले नाही. पण आता ती वेळ आलेली आहे, आपल्या देशातील, राज्यातील आणि प्रथमतः आपल्या गावातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.
यावर्षी रद्द झालेल्या यात्रा, जत्रा, सप्ताह इ. साठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोकवर्गणी गोळा करण्यात यावी, पण यावर्षी तिचा विनियोग आपल्या गावातील आरोग्य सेवा सुविधा सुधारण्यासाठी करण्यात यावा. 
कोरोनामुळ आपल्या स्वतःचा, स्वतःच्या कुटूंबाचा आणि आपल्याकडे येणाऱ्या रुग्णाच्या हिताचा विचार करुन ओ.पी.डी. बंद ठेवली. कारण स्वतः डॉक्टरच सुरक्षित नाही व त्यामुळे एखादा जरी कोरोना बाधित रुग्ण असुरक्षित अवस्थेत डॉक्टरांनी तपासला तर त्यातून डॉक्टरांच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती बाधित होणार आहे. 
हीच बाब लक्षात घेता यावर्षीचा यात्रा, जत्रा, सप्ताह, जयंती! उत्सव इ. साठीचा निधी प्रथमतः आपल्या गावातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणारे डॉक्टरांना वैयक्तिक सुरक्षा किट, नंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आवश्यक साहित्य व त्यानंतर गावातील हातावर पोट असलेल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही मदत करता आली तर ती करावी, असे आवाहान या निमित्ताने ग्रामीण भागातील गावगाडा चालविणाऱ्या सर्वांनाच करत आहे. 
जर प्रत्येक गावाने जत्रा, यात्रांचा सामुहिकरित्या केला जाणारा खर्च आपल्याच गावामध्ये सामाजिक जबाबदारी म्हणून खर्च केला तर शासनावरील खर्चाचा ताण कमी होईल. यातून डॉक्टरसह इतर आरोग्य कर्मचारी अधिक जोमाने काम करतील आणि कोरोना पासून बचावासाठी गावकरी आश्वस्त होतील आणि इतरही किरकोळ आजारांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच, आपलेच गावातील जे बांधव दररोज रोजंदारीने मजूरी वगैरे करुन उदरनिर्वाह करत होते व ज्यांच्याकडे आज पुढील काळात कुटूंब जगविण्याचा गंभीर प्रश्न आहे त्यांना देखील मदत होईल, ही बाब गांभिर्याने घेणे आवश्यक आहे.
यामुळे, मुख्य म्हणजे शासनाचे आर्थिक धोरण व नियोजनास नक्कीच मदत होईल तसेच शासनाला कोरोना विरुध्दच्या लढाईमध्ये आवश्यक प्राथमिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करता येईल. यातून मनात आणल तर खुप काही होईल नाहीतर किमान गांव पातळीवरील किरकोळ प्रश्न तरी सुटतील. 
बघा जमल तर कारण प्रश्न आधी घरातून सुरु होतो, मग वस्ती, वाडी, गांव, तालुका, जिल्हा, राज्य आणि मग देश ज्यांच घर समृध्द आहे अशा गावकऱ्यांनी आपला गांव सुरक्षित करण्यासाठी एक पाऊल पुढे यायला हवच....
यासाठी जर आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत कील्लारी भुकंपाच्या वेळी अत्यंत योग्य व्यवस्थापन राबवून राज्यात व देशातच नाहीतर जगात उत्तम आपत्ती व्यवस्थापक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब व मुख्यमंत्री पदाचा कोणताही अनुभव नसताना देखील कोरोनाच्या अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये जनता, प्रशासन, पोलिस, आरोग्य कर्मचारी व डॉक्टर यांच्याशी दररोज सुसंवाद साधून एक आत्मविश्वास निर्माण करुन राज्यातील जनतेची मानसिक स्थिती ढळू न देता एक राज्यात स्थैर्य निर्माण करणारे जनता हृदयसम्राट म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धवजी ठाकरे, राज्यातील आश्वासक, आक्रमक आणि प्रशासनावर योग्य पकड असलेले अनुभवी उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार, मंत्रीपद वाटपातील दुय्यम असलेल्या आरोग्य खात्याला एक वेगळ वलय निर्माण करुन देणारे आरोग्यमंत्री मा.ना. राजेशजी टोपे, ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ, महसूल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात, ग्रामविकास व जलसंधारणामध्ये काम करुन जागतिक स्तरावर पोहीचलेले पद्मभूषण मा. आण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार, यांच्यासह राज्यातील सर्वच जबाबदार व्यक्तींनी व लोकप्रतिनिधींनी यासाठी आवाहन केले तर त्याचा प्रभाव पडून लोक यासाठी पुढाकार घेतील व त्याचे सकारात्मक प्रतिसाद उमटतील.
-------------------------------------
✍️ ॲड. संतोष भानुदास गायकवाड 
अध्यक्ष - मानवाधिकार अभियान
रा. मु. पो. निमगांव वाघा, ता. जि. अहमदनगर 
मो.नं. ९०२८५१००२४, ९४०५००५४९२

Post a Comment

0 Comments