Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा प्रशासन आणि डॉक्टरांच्या सूचना पाळा; कोरोनामुक्त रुग्णाचे जिल्हावासियांना आवाहन


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. २९ - जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. आज या रुग्णाची बूथ हॉस्पिटलमधून तपासणीनंतर घरी रवानगी करण्यात आली. यावेळी बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस, इतर आरोग्य कर्मचार्‍यांनी स्वागत करुन त्यांना निरोप दिला. जिल्हावासियांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, या यंत्रणा आपल्यासाठीच कार्यरत आहेत, त्यांना सहकार्य करा, असे आवाहन या रुग्णाने यावेळी केले.
दरम्यान, या रुग्णावर उपचार करणार्‍या बूथ हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे आणि त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधासाठी अहोरात्र राबणार्‍या आरोग्य यंत्रणेचे आणि जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन या यंत्रणांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक केले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संवाद साधत त्यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रभावी आरोग्य यंत्रणेबद्दल कौतुक केले.
जिल्ह्यात पहिल्यांदा नगर शहरातील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. हा रुग्ण दुबईवरुन भारतात परत आला होता. त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिनांक १२ मार्च रोजी त्याचा स्त्राव नमुना अहवाल पॉझिटीव आला होता. त्यामुळे तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर १४ दिवसांनी पुन्हा त्याचे स्त्राव नमुना तापसणीसाठी पाठवण्यात आला. तो निगेटीव आल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. लगेच १५ व्या दिवशी त्याचा दुसरा स्त्राव चाचणी अहवालही निगेटीव आल्याने तो कोरोनामुक्त झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.
आज सकाळी डॉक्टरांनी पुन्हा या रुग्णाची तपासणी करुन सकाळी ११.१५ वाजता त्याची घरी रवानगी केली. यावेळी रुग्णानेही त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आणि बूथ हॉस्पिटलच्या यंत्रणेचे आभार मानले. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे आणि योग्य उपचारांमुळे मी बरा झालो, अशी भावना त्याने व्यक्त केली. सर्व नागरिकांनीही प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि आदेशांचे पालन करावे, त्या आपल्या चांगल्या आरोग्यासाठीच आहेत याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी. गर्दीत मिसळू नका, असे आवाहन या रुग्णाने केले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त श्रीकांत म्याकलवार आणि महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे, इव्हेन्जॅलिन बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर्स, सर्व स्टाफ यांनी त्या रुग्णाचे आजारातून बरा झाल्याबद्दल स्वागत केले.
आरोग्य यंत्रणेच्या योग्य उपचारामुळे हा रुग्ण लवकर बरा होऊ शकला, ही अतिशय दिलासादायक बाब असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. आपल्या आरोग्य यंत्रणेने अतिशय कष्ट घेतले. त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांचे श्री. द्विवेदी यांनी कौतुक करत आभार मानले. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा पोलीस दल प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रत्येक नागरिकाने या विषाणू संसर्गाचा धोका ओळखावा आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच स्वताच्या व समाजाच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.         

Post a Comment

0 Comments